Thursday, June 11, 2026
MAHARASHTRA

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालये महत्त्वाची – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. १५ : वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य मध्यवर्ती ग्रंथालय येथे आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले, ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व ग्रंथालये सुरू होत आहेत. ‘वाचन प्रेरणा दिन’ केवळ विशिष्ट दिवशी साजरा न करता तो 365 दिवस साजरा करण्यात यावा. विशेषतः वाचनाची चळवळ गावागावात जाण्यासाठी हा दिवस गाव पातळीवर साजरा होणे आवश्यक आहे.

ग्रंथालय चळवळ रूजावी यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिनी शासनाने ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सर्वस्तरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. डॉ.कलाम यांनी अनेक पुस्तके लिहिली. या अनमोल साहित्याचे वाचन सर्वांनी करीत त्यांचे विचार आचरणात आणावेत, असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

श्री. सामंत म्हणाले, बदलत्या काळानुरूप वाचन संस्कृती वाढण्यासाठी आवश्यक त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. ग्रंथालये आधुनिक होण्यासाठी शासनाने वेळोवेळी पावले उचलली असून शासन यासाठी सर्व सहकार्य करेल. ‘वाचन प्रेरणा दिन’ हा महाविद्यालयीन स्तरावरही मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

यावेळी, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, लेखक विश्वास पाटील, ग्रंथालय संचालनालय संचालिका श्रीमती शालिनी इंगोले उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading