Thursday, June 11, 2026
PUNE

‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची प्रतिष्ठापना आणि आॅनलाईन उत्सव शनिवारपासून

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षानिमित्त गणेश चतुर्थीला शनिवार, दिनांक २२ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा संपन्न होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

* आॅनलाईन कार्यक्रम :-
ॠषीपंचमीनिमित्त रविवार, दिनांक २३ आॅगस्ट रोजी पहाटे ६ वाजता प्रातिनिधीक स्वरुपात महिला अथर्वशिर्ष पठण आणि श्री गणेशाची महाआरती आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोनामुळे घरी राहून साधेपणाने आपण गणेशोत्सव साजरा करीत आहोत. यंदा सार्वजनिक प्रकारे कार्यक्रम करता येत नसला तरी ही अथर्वशिर्ष पठणाची परंपरा खंडित होणार नाही. ट्रस्टच्या @dagdushethganpati या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह होणार आहे. घरबसल्या यामध्ये सहभागी होण्यासाठी व रजिस्टर करण्यासाठी http://dagdushethganpati.com/marathi/rishipanchami-registration-marathi-2020/ या लिंकवर क्लिक करावे.

आॅनलाईन पद्धतीने अनेक धार्मिक, सांस्कृ तिक कार्यक्रमांचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार, दिनांक ३१ आॅगस्टपर्यंत दररोज दुपारी ४ वाजता ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवरुन निरुपणकार गाणपत्य स्वानंद पुंड शास्त्री, वणी, यवतमाळ हे अथर्वशिर्षावर निरुपण करीत आहेत. तसेच स्वरपूजा या आॅनलाईन कार्यक्रमातून दिनांक ३१ आॅगस्टपर्यंत दररोज विविध कलाकारांनी यापूर्वी श्रीं ची चरणी अर्पण केलेली गायनसेवा गणेशभक्तांना घरी बसून अनुभविता येणार आहे.

* मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम :-
मुख्य मंदिरामध्ये दररोज पहाटे ५ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त, सकाळी ६ वाजता श्री गणपती महाअभिषेक, सकाळी ७.३० वाजता महाआरती, रात्री ८ वाजता विशेष महामंगल आरती होणार आहे. वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली दररोज श्री गणेशयाग होणार आहे. यावर्षी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था आॅनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. भक्तांनी नाव व गोत्र नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने मंदिरामध्ये गुरुजींद्वारे अभिषेक होऊ शकेल. मंदिरात दररोज सत्यविनायक पूजा होणार असून शनिवार, दिनांक २९ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मंत्रजागर होईल. उत्सवात दिनांक ३१ आॅगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजता वेदमूर्ती मधुकर जांभेकर, वेदमूर्ती धनंजय घाटे यांच्या पौरोहित्याखाली श्रीं चे सहस्त्रावर्तन होणार आहे.

श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading