fbpx
Monday, June 17, 2024
BLOG

साहेब, टिकवाल ना पाच वर्षे सरकार ??

आदरणीय शरदचंद्र पवार साहेब,
राष्ट्रीय नेते,
नवी दिल्ली .

महोदय,
आपण महाराष्ट्राचे जाणते राजे . आपल्याला स्वतःला जाणता राजा म्हणून घ्यायला आवडत नाही . परंतु वस्तुस्थिती तीच आहे साहेब . आपण महाराष्ट्राचे जाणते राजे आहात आणि शेवटपर्यंत राहणार . आपल्या या उपाधी बद्दल आपल्या विरोधकांच्या पोटात गोळा उठतो . रेशीम बागेत आपल्याबद्दल प्रचंड असूया आहे . महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश करायचा आहे त्यांना . परंतु त्यामध्ये गेली ५० वर्षे आपण जिब्राल्टरसारखे भक्कमपणे उभे आहात.

या रेशीम बागेने आपल्याला महाराष्ट्रात नेस्तनाबूत करण्याचे असंख्य प्रयत्न केलेत . परंतु प्रत्येकवेळी आपण त्यांचे ‘ बाप ‘ म्हणूनच सिद्ध झालात . काय नाही केले हो त्यांनी ? आपल्याला त्यांनी सतत बदनाम केले .भ्रष्टाचाराचे प्रचंड आकडे तयार केले . गो . रा . खैरनार , संत अण्णा हजारे यांना तुमच्यावर पाठविले . परंतु ते संपले , आपण मात्र प्रत्येकवेळी स्वच्छ प्रतिमेने पुन्हा पुन्हा जनतेच्यासमोर आलात .

साहेब, ज्यावेळी तुम्हाला कॅन्सर झाला त्यावेळी ही मंडळी देव पाण्यात ठेऊन बसली होती की कधी तुम्ही जाताय . परंतु साहेब , तुम्ही त्यांनाच पाण्यात असे काय डुबविले की आता कुठे हे हळू हळू बाहेर यायला लागलेत .

साहेब, तुम्ही वैयक्तिक पातळीवर प्रत्येक संकटातून यशस्वीपणे बाहेर पडलात . त्याबरोबरच महाराष्ट्र राज्याला सुद्धा तुम्ही सुस्थितीत आणून ठेवले .

भारतीय राजकारणातील आपण सर्वात अनुभवी , ज्येष्ठ , संपूर्ण देशाचा अभ्यास असलेले , संकटमोचक , उत्कृष्ठ सामाजिक भाष्यकार , शेतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, सहकारमहर्षी , परराष्ट्र धोरणातील अभ्यासक , संगीत कलाप्रेमी , खेळातील उत्तम प्रशासक , प्रचंड स्मरणशक्ती असलेले , उत्तम वाचक , एक कुटुंबवत्सल व्यक्ती .

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील भागात लीलया वावरणारे . आणि फक्त वावरणारे नाहीत तर उत्कृष्टपणे त्या त्या भागाची माहिती असणारे , माहिती ठेवणारे .

साहेब , आपल्याबद्दल किती लिहावं , बोलावं . तुमच्या राजकीय कारकिर्दीच्या वयापेक्षाही आमचं वय कमी आहे . परंतु जेव्हापासून थोडफार राजकारण कळायला लागलंय तेव्हापासून शरद पवार हे नाव डोक्यात फिट बसलंय . कधी कधी रागावतो आम्ही तुमच्यावर . खूप खूप राग येतो तुमचा परंतु शेवटी तुम्हीच बरोबर होता हे सिद्ध होते आणि आम्ही गप्प बसतो .

आज आपले महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत राज्य आहे त्यात आपला वाटा सिंहाचा आहे . त्या जोरावरच आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे . आपल्या या मेहनतीमुळे आपलं राज्य अर्धा उत्तरप्रदेश आणि अर्धा बिहार आज पोसतोय . या परप्रतियाना आपल्या कष्टाबद्दल माहिती नाही . मुळात त्यांना महाराष्ट्राबद्दलच कमी माहिती आहे तो भाग वेगळा . असो .

साहेब, पत्र लिहिण्यास कारण की , सध्याच आपलं महाराष्ट्रातील महाआघाडीच सरकार हे फक्त आणि फक्त आपल्यामुळेच अस्तित्वात आहे . आपल्यामुळेच तीन विचारधारेचे राजकीय पक्ष एकत्र येऊन त्यांनी महाराष्ट्रात सरकार दिलं . ही एक ऐतिहासिक घटना आहे .

साहेब, सध्या विरोधकांनी लोकांच्या मनात जाणीवपूर्वक एक संभ्रम तयार करून ठेवलाय की, हे सरकार पाच वर्षे चालेल का ? परंतु या प्रश्नाला सगळ्यांकडे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे शरद पवार साहेब आहेत तोपर्यंत हे सरकार पाच वर्षे आरामात टिकेल . नव्हे ते अजून पुढची पाच वर्षे सुद्धा पुन्हा असेल . साहेब हा विश्वास फक्त आपल्या कर्तृत्वावर आहे . शरद पवार साहेब आहेत तोपर्यंत काहीही चिंता नाही असे लोक छातीठोकपणे सांगतात .

उद्धव ठाकरेसाहेब आपल्या आशीर्वादाने आणि सहकार्याने उत्कृष्टपणे सरकार चालवीत आहेत . आदित्यच्या नावाने आपल्याला काहीतरी घबाड मिळेल या आशेवर विरोधक दिवस काढीत आहेत . परंतु आपण असल्यावर आदित्यच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची आम्हाला खात्री आहे .

साहेब, त्या काँग्रेसला सुद्धा आता जास्त त्रास देऊ नका . ऑलरेडी ते महाराष्ट्रात वैतागलेले आहेत . त्यांना जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे नव्हे ती काळाची गरज आहे .

साहेब, या विरोधकांनी आता तुमच्या घरातच फोडाफोडी सुरू केली आहे . तुमच्या घरातच बंडाळी कशी होईल याची तयारी त्यांनी मागील काही वर्षांपासून सुरू केली आहे . पहिल्यांदा त्यांनी अजितदादांना ‘ वश ‘ केले . त्या वशिकरणातून तुम्ही अजितदादांना अलगद बाहेर काढलेत . परंतु वशिकरणातील थोडी गुंगी अजूनही बाकी आहे .

पार्थ पवारचे आताचे एकंदर वागणे हे बंडखोरीचे आहे हे शेंबड्या पोराला सुद्धा समजते . ही बंडखोरी त्याची एकट्याची नाही . त्याच्यामागे संपूर्ण बागबगीचा आहे . हे आपणही चांगले जाणता आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय .

साहेब, आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की , तुमच्या या घरगुती भांडणात महाराष्ट्राचे वाटोळे होईल असे काहीही होऊ देऊ नका . त्या पार्थला तुम्ही सुरवातीलाच एकदम खासदारकीचे तिकीट दिलेत . तिथेच घोळ झाला . सत्तेची चटक फार भयंकर आहे साहेब .

अजितदादांकडे कोणत्याही पदाबाबत बोलायला गेले की ते लगेच म्हणतात , पहिल्यांदा तुम्हाला पक्षासाठी काम करावे लागेल पदाच नंतर पाहू .काम करण्याबाबत काहीच अडचण नाही . काम करावेच लागेल .पण प्रश्न असा आहे की हा न्याय सगळ्यांना लागू झाला पाहिजे . मग त्यांनी स्वतःच्या मुलाबाबत वेगळा न्याय कसा काय लावला ? आपला तो बाब्या आन दुसऱ्याच ते ….

साहेब, त्या पार्थला सांगा की , बाबा तुला कुठे जायचे तिकडे जा . तू कितीही जय श्रीराम करीत माळा जपत बस . तू कितीही ९६ कुळी असलास तरी तुला कोणीही सरसंघचालक करणार नाही .

साहेब, आपण अतिशय स्पष्ट आणि कडकपणे पार्थच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे . ते त्याचे व्यक्तिगत मत आहे , पक्षाचा त्याचा काहीही संबंध नाही असे सगळ्यांनी ओवाळून टाकलेले वाक्य न बोलता आपण खणखणीत बोलला आहात . सलाम आपल्यातील पुरोगामीत्वाला . वेळप्रसंगी आपण किती कठोर व्यक्त होऊ शकता हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले .

साहेब, त्या पार्थला जाऊ द्या विरोधकांकडे . मग कळेल त्याला आपले स्वकर्तुत्व . शरद पवार नावाचं वलय आहे म्हणून दोन लोक ओळखतात तरी .नाहीतर ग्राम पंचायत सुद्धा नशिबी नाही हो .

साहेब, आपण दूरदृष्टीने निर्णय घेणारे नेते आहात . परिणामाची पर्वा न करणारे . तुम्ही त्याला सरळ पक्ष सोडायला सांगा अथवा पक्षातून काढून टाका . साहेब , आता हा तुमचा घरगुती प्रॉब्लेम नाही . तो संपूर्ण महाराष्ट्राचा प्रॉब्लेम झाला आहे . आपण किती दिवस पार्थला पकडून ठेवणार ? ज्या दिवशी त्याने जय श्रीराम केले त्याच दिवशी त्याने बाय बाय श्री शरद पवार केले आहे . आपल्याला दिलेलं ते उघड उघड चॅलेंज आहे . साहेब , हा ब्लॅक मेलिंगचा प्रकार आहे . साहेब, आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला समजते ते आपल्यासारख्या चाणक्याला समजतच असेल ना ?

साहेब , तुम्हाला सगळं समजतंय . परंतु ते तुम्ही नेहमीप्रमाणे सहन करताय . साहेब , कशासाठी सहन करताय ? जागा दाखवून द्या प्रत्येकाला प्रत्येकाची . होऊन जाऊ द्या एकदाचं समोरासमोर . रोज एक नवी पुडी सोडली जाते की ४५ आमदार घेऊन जाणार , सरकार पडणार वगैरे वगैरे . अशा स्वप्नात वावरणाऱ्या लोकांना झोपेतून गदागदा हलवून उठवा आणि द्या हाकलून त्यांना .

साहेब, आपल्यासारख्या राजघराण्यातील भांडणे / मतभेद हे फक्त आणि फक्त सत्तेसाठीच असतात . ती आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसारखी घरगुती भांडणे नसतात . एवढया पैशात हा महिना कसा चालवायचा अशासारखी भांडणे आपल्यासारख्यांच्या घरात कधीच होत नाहीत .

साहेब, हे सरकार कसेही करून पाच वर्षे टिकलेच पाहिजे . आणि जोपर्यंत आपण आहात तोपर्यंत ते टिकेलच यात तिळमात्र शंका नाही . साहेब , केंद्रातील ” ते ” दोघे काहीही करतात . मध्यप्रदेश, कर्नाटक लक्षात आहे ना? महाराष्ट्रात तुम्ही आहात म्हणून कोणाची वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होत नाही . परंतु साहेब , तुमचंही वय वाढत चाललंय . तुम्हाला जास्त दगदग सहन होत नाही . आपल्याकडे असलेल्या प्रचंड मोठ्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपण सर्व हे करीत आहात हे आम्ही सर्वजण जाणतो .

साहेब, एक सांगतो महाराष्ट्रातील सरकार टिकलं तर केंद्रातील सरकार पडणार आहे . त्यामुळे आपली फार मोठी जबाबदारी तर आहेच परंतु महाराष्ट्राच्या प्रती एक मोठं उत्तरदायित्व सुद्धा आहे .

विरोधकांना टक्कर देणारा एकच माणूस म्हणजे शरद पवार . साहेब , तुम्हाला टेंशन देण्याचं काम विरोधक करीत आहेत . आपल्याला या वयात मानसिक त्रास देऊन आपले मानसिक खच्चीकरण करण्याचा डाव आहे . आपल्याला मानसिकदृष्ट्या अशांत करणे हा यांचा पेशवाई डाव आहे . आपण यांच्या डावाला बळी पडू नका .

छत्रपती शिवराय , फुले -शाहू- आंबेडकर यांचा खरा वारसा चालविणारे आपण आहात . आपल्याविना महाराष्ट्र गाडा न चाले . आपण महाराष्ट्राची आन , बान आणि शान आहात . पुरोगामी विचारांची मंडळी आपल्याकडे नेहमीच मोठ्या आशेने पाहतात . आपल्यावर त्यांचा मोठा विश्वास आहे . सरकार पाच वर्षे टिकलेच पाहिजे नव्हे ते टिकविणे आपले आद्य कर्तव्यच आहे .

साहेब, टिकवाल ना पाच वर्षे सरकार ??

आपला निस्सीम चाहता ,

ऍड . विश्वास काश्यप,
पुणे , मुंबई ,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading