fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

चांगल्या आरोग्य सुविधा देण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री

उद्ऱ् स्वतःच्या पायावर उभे करणार कामगारांचे हित जोपासणार

मुंबई, दि. १५ :- आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५० टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार अन्नधान्य मिळेल. शेतकऱ्यांच्या समोर सतत कर्जाचा डोंगर उभा आहे. शेतकऱ्यांना या समस्येतून कायमस्वरूपी कसे मुक्त करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे २९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १८ हजार ९८० कोटी रुपये रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून कर्जमुक्त करण्यात आले आहे. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे ४१८ लाख क्विंटल कापूस खरेदी यावर्षी शासनाने केलेली आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, किसान हरितक्रांती करतात तर जवान आपल्या देशाचे रक्षण करतात. त्याचबरोबरीने आपले कामगार सुद्धा उद्योगाची बाजू समर्थपणे सांभाळत असतात. म्हणून कामगारांच्या हिताकडेही शासन तितकेच लक्ष देईल. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘महाजॉब्ज’ हे पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे राज्यात नवीन उद्योग येतील. कामगारांना रोजगार उपलब्ध होईल. जय जवान, जय किसान, जय कामगार हे यापुढे आपल्या राज्याचे ध्येय असेल.

पहिले राज्य

ऑनलाईन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सर्वसामान्य गरीब माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

उद्योग

अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यात सध्या सुमारे ५० ते ६० हजार उद्योग सुरू झाले आहेत. उद्योग क्षेत्रात १२ देशांमधील गुंतवणूकदारांसोबत सुमारे १६ हजार कोटीं रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

कोविड योद्धे

कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स, नर्सेस, इतर वैद्यकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हेच खरे कोविड योद्धे आहेत. या काळातही न डगमगता ते समर्पित भावनेने सेवा देत आहेत. कोरोनातून बरे झालेले नागरिकही लढवय्ये आहेत. त्यांचे मी कौतुक करतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाच्या कालावधीत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आपले काम चोखपणे बजावले. पण हे करताना काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कोरोनाला बळी पडले. त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अहोरात्र आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज असणाऱ्या आपल्या जवानांच्या कामगिरीचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना त्यांनी अभिवादन केले. राज्यातील राष्ट्रपती पदक, शौर्यपदक आणि प्रशंसनीय सेवा पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. दरम्यान मनोगत व्यक्त केल्यानंतर त्यांनी कोविड योध्दांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

सर्व धर्मीयांचे आभार

कोरोनाच्या कालावधीत सर्व धर्मीयांचे महत्त्वाचे सण-उत्सव येऊन गेले आणि पुढेही ही येत आहेत. मात्र सर्वांनीच संयम बाळगून, नियमांचे पालन करून, शांततापूर्वक हे सणवार साजरे केले आणि देशासमोर एक आदर्श उदाहरण उभे केले. त्यांचे देखील या निमित्ताने मी मनःपूर्वक आभार मानतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आरोग्यविषयक महत्त्वाचे निर्णय

 राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर शासनाने त्वरेने पावले उचलली. देशात प्रथमच तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. जिल्ह्यातील डॉक्टरांचे सुद्धा टास्क फोर्स तयार केले. गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या तयार करून गावकरी आणि लोकांवरही जबाबदारी टाकण्यात आली. महाराष्ट्र हा लढवय्यांचा प्रदेश आहे. कितीही संकट आली तरी आपण डगमगलो नाही.

राज्यात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे ट्रेकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटला वेग दिला आहे. राज्यात जिल्ह्याजिल्ह्यात रुग्ण सुविधांची उभारणी वेगाने सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी रुग्ण वाढीचा वेग काहीसा कमी झाला आहे. कोरोनाविरुद्धचा लढा हा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. कोरोनावर आतापर्यंत लस आलेली नाही. परंतु सुरक्षित अंतर ठेवणे, स्वयंशिस्त, स्वच्छता पाळणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे या उपायांद्वारे आपल्याला हे संकट परतवून लावायचे आहे.

आधी आपण लॉकडाऊन केले. नंतर पुनश्च हरिओम करून आपण अतिशय सावधपणे हळूहळू अनेक गोष्टी पुन्हा सुरू करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले.

आदिवासींच्या कल्याणासाठी

शासनाने साडेचार कोटी लिटर दुधाचे रूपांतर भुकटीत केले. आदिवासी मुले व महिलांना ही दूध भुकटी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली खावटी योजना सुरू करण्यात आली असून 100 टक्के अनुदान म्हणून 2 हजार रुपये रोख रक्कम आणि दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेतील आदिवासींना दिलासा मिळणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग

कोरोनाचे संकट असतानाही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेसमृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. हा महामार्ग केवळ रस्ता असणार नाही तर या महामार्गाच्या दुतर्फा अनेक सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे हा महामार्ग खऱ्या अर्थाने समृद्धी आणल्याशिवाय राहणार नाही.

आरोग्य, शेती, उद्योग अशा ज्या – ज्या क्षेत्रात क्रांती करण्याची गरज आहे तिथे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. यापुढील काळातही महाराष्ट्र हे देशाला दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही. जवान, किसान आणि कामगारांना एकत्र घेवून आपण स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मनोगतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  श्रीमती रश्मी ठाकरे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच विविध विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्यासह कोरोनावर मात केलेले कोरोना योद्धे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading