Friday, October 23, 2026
ENTERTAINMENT

अभिनेत्री भाग्यश्री मोटे साकारणार पार्वती

गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचच आराध्य आणि लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी गणपती विशेष भागांची भव्यदिव्य मालिका घेऊन येत आहे. २२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता ही मालिका आपल्या भेटीला येईल. कोरोनाच्या या संकटकाळात गणपती उत्सवाला बंधनाची मर्यादा आहे. मात्र स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये ‘देवा श्री गणेशा’ या महामालिकेच्या रुपात गणपती बाप्पालाच आपल्या घरी घेऊन येणार आहे. बाप्पाच्या या विशेष मालिकेमध्ये माता पार्वतीच्या रुपात दिसेल अभिनेत्री भाग्यश्री मोटे. भाग्यश्रीच्या लूकची ही खास झलक आम्ही घेऊन आलो आहोत. भाग्यश्रीच्या लूकवरुनच मालिकेची भव्यता लक्षात येईल. भाग्यश्रीचा लूक डिझाईन केला आहे शिबाप्रिया सेन यांनी. ‘देवा श्री गणेशा’ मालिकेमधील माता पार्वतीचा लूक समोर आल्यानंतर गणपती बाप्पा कोण साकारणार याची उत्सुकता आहे.

भाग्यश्री मोटे या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना म्हणाली, ‘देवयानी नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहची ‘देवा श्री गणेशा’ ही भव्यदिव्य मालिका साकारायला मिळते आहे याचा प्रचंड आनंद आहे. पार्वतीच्या रुपात जेव्हा मी स्वत:ला पाहिलं तेव्हा मी भारावून गेले होते. या लूकवर बरीच मेहनत घेण्यात आलीय. माता पार्वतीची सौम्यता तिचा हवळेपणा आणि प्रसंगी समोर येणारं रौद्र रुप हे साकारायला मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.’

२२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता सुरु होणाऱ्या स्टार प्रवाहच्या ‘देवा श्री गणेशा’ मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी बिगबजेट मालिका आकाराला येतेय. महाभारत, राधेकृष्ण यासारख्या भव्यदिव्य मालिका साकारणारे सुप्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ कुमार तिवारी यांच्या स्वस्तिक प्रोडक्शन्सने ही भव्य मालिका साकारण्याचं आव्हान पेललं आहे. ही महामालिका साकारण्यासाठी स्टार प्रवाह आणि स्वस्तिक प्रोडक्शन्सची संपूर्ण टीम दिवसरात्र मेहनत करते आहे. उमरगाव इथे या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला येत असून लवकरच शूटिंगचा श्रीगणेशा होणार आहे.

चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाविषयीच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण या गोष्टींमागे असणाऱ्या अनेक रहस्यमयी कथांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. बाप्पाच्या जन्मापासून ते अगदी लग्नापर्यंतच्या अश्या गोष्टी ज्या आपण कधीही ऐकल्या आणि पाहिल्या नाहीत ते दाखवण्याचा प्रयत्न या अनोख्या मालिकेतून करण्यात येणार आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर गणेशोत्सव काळात चंद्रांचं तोंड पाहू नये अन्यथा चोरीचा आळ येतो असं ऐकीवात आहे. बाप्पाची झालेली फजिती पाहून चंद्र हसला आणि बाप्पाने चंद्राला शाप दिला ही गोष्ट प्रचलित आहेच. मात्र चंद्राला शाप दिलेल्या बाप्पाच्या भाळी चंद्र कसा? बाप्पा भालचंद्र कसा झाला? याची कथा मात्र बऱ्याच जणांना माहित नाही. ‘देवा श्री गणेशा’ या ११ भागांच्या विशेष मालिकेतून ११ ऐकलेल्या मात्र त्याविषयी फारशी माहिती नसलेल्या बाप्पाच्या पौराणिक गोष्टींचा उलगडा होणार आहे. मराठी मालिकांच्या इतिहासात आजवर असा प्रयोग कधीच झालेला नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात स्टार प्रवाह वाहिनी मनोरंजनाचा अनोखा ठेवा घेऊन येणार आहे.

या भव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘दैनंदिन मालिकांच्या गर्दीत स्टार प्रवाह फक्त ११ विशेष भागांची मालिका घेऊन येत आहे. रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत ११ सशक्त आणि विशेष काहीतरी द्यायचा प्रयत्न आहे. सध्याच्या परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे स्टार प्रवाह आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या भव्य रुपाचं दर्शन घरोघरी घडवून आणणार आहे. बाप्पाच्या गोष्टींमध्ये लपलेले आणि माहित नसलेले पैलू या विशेष मालिकेद्वारे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकतील. या भव्य मालिकेतून संस्कार घडवणाऱ्या छान गोष्टी भव्य स्वरुपात पहायला मिळणार आहेत. बाप्पाच्या या गोष्टी पहाताना मन गर्व आणि आनंदाने नक्कीच भरुन येईल अशी खात्री आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading