fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

मुंबईत लवकरच अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 1 : अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून जनजागृती केली. त्यांच्या या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांची साहित्यसंपदा एका ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यादृष्टीने त्यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक सर्वांच्या सहकार्याने मुंबईत लवकरच उभारले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर युरेशियन स्टडीज व रशियन विभागातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, शताब्दीनंतरही अण्णाभाऊंची आठवण जिवंतपणा देते. त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर भाषा सातासमुद्रापार पोहोचविली. त्यांचे साहित्य अजूनही लोकप्रिय आणि अलौकिक आहे. परखड मत मांडणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतही मोठे योगदान होते. त्यांनी आपले पोवाडे आणि गीतांच्या माध्यमातून जनमानसांना त्यांच्यातील हिमतीची आणि कर्तव्याबाबतची जागृती करून दिली. कामानिमित्त मुंबईत आलेल्यांना मुंबई माझी असल्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण करून लौकिक कमावला.

हे वर्ष लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे तर लोकशाहीर म्हणून लौकिक मिळविलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे शताब्दी वर्ष आहे. एक तेज लोप पावले तर दुसरे उगवले हा विलक्षण योगायोग असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी दोघांच्याही कार्याचा गौरव केला.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, रशियन स्टेट युनिव्हर्सिटीमधील अभ्यासक, मुंबई विद्यापीठातील मान्यवर, रशियन विभाग आणि विद्यापीठाच्या मध्य युरेशिया अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. संजय देशपांडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading