‘दोहे इलाहीचे’ द्विखंडांचे पुण्यात प्रकाशन
पुणे, दि. २ – ज्येष्ठ साहित्यिक, सुप्रसिद्ध गजलकार इलाही जमादार लिखित ‘दोहे इलाहीचे’ या १३ हजार ३६२ दोह्यांचा समावेश असलेल्या द्विखंडांचे आज पुणे येथे प्रकाशन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सभागृहात हा प्रकाशन समारंभ पार पडला.
वार्धक्याने आलेल्या आजारासाठी इलाही जमादार गेल्या दोन आठवड्यांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. नांदेड येथील प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्या ‘निर्मल’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘दोहे इलाहीचे’ या द्विखंडांचे संपादन नांदेड येथील प्रा. विकास कदम यांनी केले आहे.
‘दोहे इलाहीचे’ या द्विखंडांचे प्रकाशन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे विश्वस्त व वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे सहाय्यक शिरीष रायरीकर, मंत्रालयातील कृषि व प.दु.म. विभागातील अवर सचिव विकास तु. कदम, मंत्रालयीन उपहारगृहाचे महाव्यवस्थापक तथा अवर सचिव सुरेंद्र अंबिलपुरे, सुप्रसिद्ध कवयित्री माया भद्रे, मंगेश रूपटक्के, प्रशांत इंगोले यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
‘दोहे इलाहीचे’ ऐतिहासिक ठेवा
इलाही जमादार हे नाव मराठी साहित्यविश्वातील ऐतिहासिक ठेवा आहे, असे डॉ. धनंजय केळकर यांनी ‘दोहे इलाहीचे’ या द्विखंड प्रकाशन प्रसंगी प्रतिपादन केले. गजल लेखनाने इलाही जमादार यांनी मराठी व हिंदी गजल संपन्न केल आहे, हे निर्विवाद आहे. परंतु मराठीमध्ये १५ हजारांपेक्षा अधिक ‘दोहा’ लिहिणारे इलाही हे मराठी भाषेला लाभलेले वरदान आहेत. एवढ्या विपुल प्रमाणात मराठी दोहे लिहिणारे ते पहिले कवी आहेत, असेही मत याप्रसंगी डॉ. धनंजय केळकर यांनी नोंदवले.
याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ. केळकर म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सातत्याने पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबर अनेक मोठमोठ्या साहित्यिक आणि कलावंतांचा सहवास राहिला आहे. आज ‘दोहे इलाहीचे’ या इलाही जमादार यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होतो आहे, हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा सन्मान आहे,.असे आम्ही समजतो. इलाही जमादार यांची पं. हृदयनाथ मंगेशकरां सोबत दोन-तीन वर्षांपूर्वी आपली भेट झाली. त्यांची मराठी -हिंदी गजल ही त्यांच्या प्रतिभेची उंची सांगते. ‘दोहे इलाहीचे’ या दोन खंडांमधील त्यांचे दोहे रसिक- वाचकांच्या मनाच्या अंतरंगात उतरल्याशिवाय राहणार नाहीत, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या अनेक रचना आपल्याला आवडणाऱ्या आहेत असे सांगत डॉ.धनंजय केळकर यांनी शेवटी त्यांचे काही शेर सादर केले.
‘दोहे इलाहीचे’ प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिरीष रायरीकर यांनी पं. हृदयनाथ मंगेशकर आणि इलाही जमादार यांच्या परिचयाचा किस्सा सांगितला. एका प्रकाशन सोहळ्यात इलाही जमादार यांचे गजलांचे पुस्तक ‘गुफ्तगू’ हाती पडल्यानंतर ते पुस्तक मी पंडितजींना वाचण्यासाठी दिले. ‘गुफ्तगू’ मधील गजला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना खूप भावल्या. त्यानंतर स्वतः पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी इलाही जमादार यांची भेट घेतली आणि त्यांचे कौतुक केले. तेव्हापासून इलाही जमादार हे मंगेशकरांच्या सहवासात आहेत, असे त्यांनी सांगितले.
‘दोहे इलाहीचे’ या दोन खंडांचे संपादक प्रा. विकास कदम यांनी या पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे इलाही जमादार यांची स्वप्नपूर्ती होय, असे सांगितले. सदर दोन खंडांमध्ये असलेल्या एकूण १३ हजार ३६२ दोहे आहेत. प्रख्यात चित्रकार संतोष घोंगडे यांनी या पुस्तकांचे कलात्मक मुखपृष्ट साकारले आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी ‘दोहे इलाहीचे’ खंडांची पाठराखण केली आहे.
मंत्रालयाच्या कृषि व प.दु.म. विभागातील अवर सचिव विकास तू. कदम यावेळी बोलताना म्हणाले,
‘दोहे इलाहीचे’ सर्वव्यापी, सर्वस्पर्शी असून या दोह्यांमधून सामाजिक सांस्कृतिक व नैसर्गिक प्रतिभा अतिशय प्रगल्भपणे आलेली आहे. कबीरांच्या दोह्यांमधील सामाजिक आत्मभान सांगणाऱ्या नैतिक मूल्यांची पाठराखण करण्यात ‘दोहे इलाहीचे’ यशस्वी ठरले आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी इलाही जमादार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केक कापून इलाही जमादार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. पुस्तक प्रकाशन समारंभ घेण्याची परवानगी दिल्याबद्दल प्रा. विकास कदम यांनी शेवटी दिनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाचे आभार मानले.
*इलाही जमादार*
‘दोहे इलाहीचे’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर आग्रहास्तव इलाही जमादार यांनी मार्मिक भाष्य केले. “मौनातून जे काही व्यक्त होत असते ते कोणालाही कळू शकत नाही आणि मौनातून व्यक्त होण्याइतकं मौल्यवान दुसरं काही असू शकत नाही,” अशा भावना त्यांनी थोडक्यात व्यक्त केल्या.
पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्याही शुभेच्छा
इलाही जमादार यांच्या ‘गुफ्तगू’ या हिंदी गजल संग्रहाने प्रभावित असलेले पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी या प्रकाशन सोहळ्याला शुभेच्छा संदेश पाठवला. “शायर इलाही यांच्या ‘दोहे इलाहीचे’ हा प्रकाशन समारंभ मला पाहता आला असता तर अधिक आनंद झाला असता. पण लॉकडाऊनमुळे मला उपस्थित राहता येत नाही, याची खंत आहे. शायर इलाही यांच्या मराठी -हिंदी गजल प्रमाणेच ‘दोहे इलाहीचे’ मराठी साहित्यात वाचकांच्या पसंतीच्या शिखरावर पोहोचतील,” अशा सदिच्छाही सुप्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या संदेशात पाठवल्या आहेत.
