स्वॅबचा रिपोर्ट अवघ्या चार तासात; परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात सुविधा
परभणी, दि.25 – येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोना चाचणीची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत झाली आहे.त्यामुळे आता अवघ्या चार तासात संशयित रुग्णांच्या स्वॅबचा अहवाल प्राप्त होत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात संशयित रुग्णांचा स्वॅब घेवून तो नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस पाठविण्यात येत होता. प्रयोगशाळेतून त्या स्वॅबचा अहवाल प्राप्त होण्याकरिता दोन-दोन दिवस प्रतिक्षा करावी लागत. विशेषतः त्या प्रयोगशाळेवर नांदेड व हिंगोली या दोन जिल्ह्याचा मोठा ताण असल्याने मध्यंतरी संशयित रुग्णांच्या स्वॅबच्या वाढत्या संख्येने प्रयोगशाळेकडून संबंधीत स्वॅबचा अहवाल प्राप्त होण्याकरिता चार-चार दिवस प्रतिक्षा करावी लागत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने येथील एका खासगी पॅथोलॉजीच्या सहकार्याने प्राप्त मशिनरीच्या आधारे स्वॅब टेस्टींग सुरू केले होते. परंतू काही तांत्रिक अडचणीमुळे ती यंत्रणा ठप्प झाली. मात्र, तज्ञांना पाचारण करीत टेस्टिंगची यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली. पाठोपाठ ही यंत्रणा पूर्णक्षमेतेने कार्यान्वीत करण्यात आली. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील संशयितांच्या स्वॅबचा अहवाल अवघ्या चार तासास प्राप्त होत आहे.पाठोपाठ त्या पॉझिटीव्ह असो कि निगेटीव्ह रिपोर्टकरिता नांदेड येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहण्याचेही गरज भासणार नाही, असे रुग्णालयाच्या सूत्राने सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून या यंत्रणेने पूर्ण क्षमतेने कामासही सुरूवात केली आहे. दिवसभरात एकूण 30 स्वॅबची चाचणी यंत्राच्या माध्यमातून होणार आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने दिली.