fbpx

नैराश्य कमी करण्यासाठी हसत राहा; साईनाथ मंडळ ट्रस्टच्यावतीने कोरोना वॉरियर्स स्वच्छता दूतांचा सन्मान

पुणे, दि. २० – आजची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात मानसिक आजार वाढणार आहेत. परंतु मानसिक आजारापासून दूर राहायचे असेल तर शरिराबरोबर मनाचा व्यायाम देखील गरजेचा आहे. हास्याने मनावरील ताण कमी होतो. प्रत्येकजण समस्येविषयी बोलतो पण समस्या आली की ती सोडविण्याविषयी कोणी बोलत नाही. जेव्हा समस्या येते तेव्हाच त्यातून रोजगाराची संधीदेखील उपल्बध होते. ही संधी शोधा म्हणजे तुम्ही आजच्या परिस्थितीचा सामना करू शकाल. ज्याच्याकडे मनाची ताकद असते तो कोणत्याही आजारातून बरा होऊ शकतो. हास्यातून जगण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे नैराश्य कमी करण्यासाठी हसत राहा, असे मत लाफ्टरयोगा ट्रेनर मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केले.

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्यावतीने कसबा पेठ विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत असलेल्या सफाई कर्मचारी या कोरोना वॉरियर्सचा सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी सॅनिटरी अधिकारी अशोक भालेराव, साईनाथ मंडळचे अध्यक्ष पियूष शहा, नरेंद्र व्यास, संतोष शर्मा, संकेत देशपांडे, शरण रटकळकर, कुमार आणवेकर, नावेदभाई शेख, साहिल केळकर, सर्वेश पवार, भोला वांजळे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. विजय पोटफोडे, डॉ. पराग रासने जिव्हाळा परिवारचे निरंजन जाधव, वंदेमातरम संघटनेचे किरण राऊत, आशा परिवारचे पुरूषोत्तम डांगी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक अंतर ठेवून मास्क, पौष्टीक चिक्की, आयुर्वेदिक गोळ््यांचे वाटप करण्यात आले.

पियुष शहा म्हणाले, कोरोनासारख्या महामारीमुळे समाजातील सर्वच घटकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा रोगराईच्या काळातही परिसर स्वच्छ ठेवणारे स्वच्छता दूत न थांबता काम करीत आहेत. आपल्या व घरातील व्यक्तींच्या आरोग्याची चिंता मनात असतानाही आपले काम ते चोख पार पाडत आहेत. या कोरोना वॉरियर्सच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच त्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी हास्ययोगा देखील करण्यात आला.

One thought on “नैराश्य कमी करण्यासाठी हसत राहा; साईनाथ मंडळ ट्रस्टच्यावतीने कोरोना वॉरियर्स स्वच्छता दूतांचा सन्मान

  • June 20, 2020 at 4:16 pm
    Permalink

    Khup positive batmi ,dhanywad
    Safai sainik khup karya kele tyancha gaurav hone ani hasun tanav dur karne garjeche hote

    Reply

Leave a Reply

%d bloggers like this: