ग्रहणामुळे रविवारी दत्तमहाराजांना पांढऱ्या वस्त्रांचे आच्छादन
कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट ; मंदिर बंद असल्याने केवळ धार्मिक विधी होणार
पुणे, दि. १९ – ज्येष्ठ अमावस्येला रविवार (दि.२१) सूर्यग्रहण आहे. ग्रहण स्पर्श सकाळी १०:०१ व ग्रहणमोक्ष दुपारी १:२८ वाजता आहे. ग्रहणाचा एकूण पर्वकाळ ३ तास २७ मिनिटांचा आहे. त्यामुळे या कालावधीत दत्तमहाराजांच्या मूर्तीवरील सर्व अलंकार व पोशाख उतरवून श्री दत्तमहाराजांचे मूर्तीस नूतन श्वेत वस्त्र परीधान केले जाईल. तसेच केवळ धार्मिक विधी होणार असल्याचे बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असून सरकारी निर्बंध असल्याने मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी कृपया मंदिराबाहेरून दर्शन घेऊन सहकार्य करावे. कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे म्हणाले, मंदिराच्या धार्मिक परंपरेनुसार ग्रहण पर्व कालात जलधारांनी अभिषेक, जपजाप्य, मंत्र पुरश्चरण इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रम केले जातील.
उत्सवप्रमुख शिरीष मोहिते म्हणाले, हे ग्रहण दिवसाच्या दुस-या प्रहरात असल्यामुळे शनिवारी, दि. २० जूनच्या रात्री १० पासून ते रविवार दि. २१ जून च्या दिवशी दु. १:२८ पर्यंत म्हणजेच ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी रविवार दिनांक २१ पहाटे ४:४५ पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.