fbpx

हजारों विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या निकालाच्या प्रतिक्षेत

परभणी, दि.13 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2019 या वर्षात घेतलेल्या विविध पदांसाठीच्या परीक्षाचे निकाल अद्यापही जाहीर झाले नसून त्यामुळे हजारो विद्यार्थी या निकालाच्या प्रतिक्षेत ताटकळत आहेत.

सरकारी सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारों विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा करिता रात्र-दिवस अभ्यास करीत असतात. परीक्षा देवून यशस्वी होत असतात. गेल्यावर्षीही विविध पदांकरिता हजारों विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या. विशेषतः राज्य सेवा मुख्य परीक्षा(अंतिम निकाल), उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा(अंतिम निकाल), लिपीक, टंकलेखक, मराठी/इंग्रजी मुख्य परीक्षा(अंतिम निकाल), कर सहाय्यक मुख्य परीक्षा(अंतिम निकाल), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवामुख्य परीक्षा व महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षां हजारों विद्यार्थ्यांनी दिल्या. परंतू लोकसेवा आयोगाने घेतलेल्या या परीक्षांचे आजपर्यंत निकाल लागले नाहीत.आज ना उद्या निकाल घोषीत होईल म्हणून विद्यार्थी प्रतिक्षेत होते. परंतू लोकसेवा आयोगाने या निकालाबाबत अव्वाक्षरही काढले नाही. प्रलंबीत निकालामुळे हजारों विद्यार्थ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून पुढे काय करावे, असा प्रश्‍न या विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. एनएसयुआय या संघटनेचे प्रदेश सचिव मयूर गोरे व जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाटील या दोघा पदाधिका-यांनी आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांना शुक्रवारी या अनुषंगाने एक निवेदन पाठविले. त्याद्वारे प्रलंबीत निकालामुळे विद्यार्थी मानसीक तणावाखाली असून ते हवालदिल झाले आहेत,असे नमुद केले. लोकसेवा आयोगाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी होणा-या परीक्षा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलेल्या आहेत. तेव्हा या परीक्षांची तयारी करावी की नाही, हा सुध्दा संभ्रम विद्यार्थ्यांत आहे,असे या पदाधिका-यांनी निवेदनातून म्हटले आहे.
दरवर्षी मुलाखती नंतर साधारणतः 20 ते 25 दिवसांत निकाल लागतो. परंतूू यावेळी फार मोठा उशिर झाला आहे. निकाल प्रलंबीत असल्याने विद्यार्थ्यांना भविष्याबद्दल अनिश्‍चितता भासू लागली आहे. त्यामुळेच आयोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षाचे निकाल तातडीने जाहीर करावे. राज्य सेवा पुर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व संयुक्त पुर्व परीक्षा कधी घेतला जातील, याबाबत खुलासा करावा, अशीही मागणी या दोघा पदाधिका-यांनी केली.
दरम्यान, सात दिवसांच्या या मागण्या संदर्भात आयोगाने विचार न केल्यास महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय या संघटनेतर्फे पूर्ण राज्यात आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: