Good news मागील 48 तासांत एकाही पोलिस करोना पॉझिटिव्ह नाही
मुंबई, दि. 10 – करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यापासून महाराष्ट्र पोलीस दिवस-रात्र रस्त्यांवर तसंच ठिकठिकाणी कडक पहारा देत नियमांचं योग्य पालन व्हावं याची खबरदारी घेत आहे. मात्र लोकांनी घरात थांबावं यासाठी रस्त्यांवर जीव धोक्यात घालून बंदोबस्त करणाऱ्या पोलीस दलातील अनेक योद्ध्यांनाच करोनाची लागण झाली आहे. यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण अशा परिस्थितीत एक चांगली बातमी आली असून गेल्या 48 तासात एकाही पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 48 तासात एकाही पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झालेली नाही. आतापर्यंत 2562 पोलिसांना करोनाची लागण झालेली असून 34 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. करोनामुळे एकीकडे लोकांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण असताना ही बातमी नक्कीच पोलीस खात्याला आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी आहे.