fbpx
Monday, October 2, 2023
MAHARASHTRA

‘लॉकडाऊन’मध्ये बचत गटाच्या बँक सखींनी केला दोन कोटी रुपयांचा बँक व्यवहार!

नागपूर, दि. 8 : बचत गटाच्या बँक सखींनी ‘लॉकडाऊन’च्या काळातही ग्रामीण भागातील महिलांना बँकेत पैसे काढणे व जमा करणे आदी व्यवहार अत्यंत सुलभपण सुरु ठेवले आहेत. मागील तीन महिन्यात 6 हजार 605 खातेदारांना तब्बल 2 कोटी 15 लक्ष 90 हजार रुपयांचा बँक व्यवहार पॉस मशिनच्या सहाय्याने पूर्ण केला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती ‘उमेद’ अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहायाने बचत गटाच्या बँक सखींनी बॅंकेचा व्यवहार पूर्ण करुन ग्रामीण भागातील बँकेच्या खातेदारांना मदत केली आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळातील सामाजिक अंतर ठेवत तसेच सॅनिटायझरचा वापर करुन ग्रामीण जनतेला बँकेच्या सेवा सहज आणि सुलभपणे उपलब्ध करुन दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील महिलांना बँकेच्या व्यवहारासाठी शहरापर्यंत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातच काम करणाऱ्या ‘उमेद’च्या  बी.सी. सखींनी बँकेचे व्यवहार करुन मागील तीन महिन्यात तब्बल 2 कोटी 15 लक्ष 90 हजार रुपयांचा बँकिंग व्यवहार यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

बचत गटाच्या बँक सखींनी बँकेचे व्यवहार पूर्ण केले असून बी.सी. सखींनी व्याहाड येथील श्रीमती द्रोपदी टापरे यांनी ‘उमेद’ अभियानामुळे रोजगार मिळाल्याचे सांगताना बँकेच्या व्यवहारासंदर्भात काम करताना नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली. या काळात तब्बल 2 हजार 120 खातेदारकांची बँकेचा व्यवहार यशस्वी पूर्ण करुन 75 लक्ष 76 हजार रुपयांची देवाण-घेवाण पूर्ण केली आहे. गोंडखैरी येथील सिंडीकेट बॅंकेमार्फत बी.सी. सखी म्हणून ग्रामीण महिलांना ‘लॉकडाऊन’च्या कठीण काळातही मदत करण्याचा आनंद मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ‘उमेद’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बचत गटाच्या सदस्यांची बी.सी. सखी म्हणून निवड केल्या जाते. निवड केलेल्या सख्यांना बँकिंग व्यवहाराबाबत प्रशिक्षण दिल्यानंतरच संबंधित बँकेच्या शाखेमार्फत गावातील खातेदारांना बँकेतून पैसे काढणे व जमा करणे आदी व्यवहार करण्याची परवानगी दिली जाते.

‘लॉकडाऊन’च्या काळात बँक सख्यांनी विशिष्ट कार्य केले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व प्रकल्प संचालक विवेक इंदणे यांनी दिली. जिल्हा अभियान व्यवस्थापक रविंद परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बँक सखी’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: