fbpx

कोरोना – शाळा सुरु करणे ‘या’ देशाला पडले महाग

करोनावर नियंत्रण मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलेल्या मोजक्या देशांमध्ये इस्रायलचा समावेश आहे. त्यामुळेच इस्रायलने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शाळा सुरु करण्याला परवानगी दिली. मात्र त्यानंतर येथील करोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार ३०१ विद्यार्थी आणि शिक्षकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर शाळेत जाणारे विद्यार्थी आणि कर्मचारी अशा १३ हजार ६९६ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती या करोनाबाधितांच्या संसर्गात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने करोनाबाधितांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने देशामधील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ८७ शाळांना तातडीने बंद करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत.

इस्रायलमध्ये करोनाबाधितांची संख्या मार्च महिन्यापासून वाढू लागली होती. एप्रिल महिन्यामध्ये देशातील करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळेच देशामधील चाचण्यांची संख्या वाढवण्याबरोबरच लॉकडाउन अधिक कठोर निर्बंध घालून पाळण्यासंदर्भातील उपाययोजना सरकारने केल्या. ३० एप्रिलपर्यंत इस्रायलमध्ये करोनाबाधितांची संख्या १५ हजार ९४६ इतकी होती. पुढील १५ दिवसांमध्ये करोनाबाधितांची संख्या ६०० ने वाढली. त्यामुळे करोनावर नियंत्रण मिळवल्याचा विचार करुन सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. ३ मे रोजी ६० टक्के विद्यार्थी शाळामध्ये उपस्थित होते. मात्र त्यानंतर शाळांमधील मुले आणि शिक्षकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे चाचण्यामधून समोर आलं.

शाळा सुरु केल्यामुळे देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये ६५ शाळा बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुरुवारी २० हून अधिक शाळा बंद करण्यासंदर्भातील निर्देश सरकारने जारी केले. त्यामुळे एकूण बंद करण्यात आलेल्या शाळांची संख्या ८७ च्या पुढे गेली आहे. तेल अविवमधील दोन प्रमुख शाळामधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आल्यानंतर या शाळामधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना होम क्वारंटाइन होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: