अॅड.प्रकाश आंबेडकरांना धक्का, भारिपच्या 2 माजी आमदारांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
मुंबई, दि. 4 – वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. दोन माजी आमदारांनी वचिंत बहुजन आघाडी पक्षाला राजीनामा दिला असून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोघांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी शरद पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जंयतराव पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगणराव भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राहुल डोंगरे आदींची उपस्थिती होती. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने दोन्ही माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल माध्यमांवरून दिली.\
हरिदास भदे व बळीराम सिरस्कर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. श्री. हरिदास भदे हे 1992 व 2003 मध्ये अकोला जिल्हा परिषद सदस्य होते, तर 2004 व 2009 साली ते अकोल्यातून विधानसभेवर निवडून आले. भदे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव म्हणुन कार्यरत होते. या दोन माजी आमदारांनी वंचित सोडण्याचं कारण पक्षांतर्गत असलेले मतभेद कारणीभूत असल्याचे म्हटले जातेय. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाबाबत माहिती मिळाल्यामुळेच ३१ मे रोजी वंचित बहुजन आघाडीतील वादासंदर्भात कार्यकर्त्यांवर कारवाईचा बगडा उगारणारे पत्र काढण्याची आल्याची चर्चा आहे.