मच्छिमारांना सतर्क करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री किनारपट्टी भागातील गावात!
मुंबई, दि. ३ : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख हे ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भाटी, मढ व अन्य किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये जाऊन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहेत.

काल रात्रीपासून मंत्री श्री. शेख हे किनारपट्टी भागातील गावांमध्ये जाऊन मच्छीमारांना निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. या संकटाच्या काळात येवढ्या रात्री राज्याचे मंत्री आपल्याला धीर देण्यासाठी येतात, ही बाब येथील मच्छीमारांना या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आत्मविश्वास देणारी ठरत आहे.
भाटी संस्थेचे उप-चेअरमन लक्ष्मण कोळींची याबाबतची प्रतिक्रिया फारच बोलकी आहे. लक्ष्मण कोळी सांगतात, “एवढ्या वर्षांमध्ये अनेक वादळं आली पण एकही मंत्री आम्हाला कधी भेटायला आला नाही. हे पहिले मंत्री असे आहेत जे या कठीण काळात एका सामान्य माणसाप्रमाणे आम्हाला धीर देण्यासाठी आलेत.”
रात्री उशिरापर्यंत मंत्री अस्लम शेख यांनी गावकऱ्यांच्या गाठी-भेटी घेण्याचा सिलसिला चालूच ठेवला होता. मच्छीमार बांधवांना धीर देणं , त्यांना सतर्क व सावध करणं हे त्यांना जास्त महत्त्वाचं वाटत असल्याने त्यांनी थेट मच्छिमारांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली.