fbpx
Thursday, September 28, 2023
ENTERTAINMENTPUNE

राज्यातील चित्रपट, नाट्य क्षेत्रासह लोककलावंताना शासनाकडून मदत मिळावी

– चित्रपट निर्माते, अ.भा. मराठी नाट्य परिषद अध्यक्ष व नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे मागणी


पुणे, दि. ३० –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेती, उद्योग यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील लोककलावंत, शाहीर, ऑर्केस्ट्रा कलाकार, नाट्य कलावंत यांच्या  उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे या सांस्कृतिक क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांना आणि कामगारांना मदत मिळावी अशी मागणी चित्रपट निर्माते,  अ. भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखेचे अध्यक्ष व नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात भाऊसाहेब भोईर यांनी म्हटले आहे की, राज्यपातळीवर जिल्हाधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, नगरपरिषद यांच्यातर्फे कलाकारांना महिनाभर पुरेल इतक्या धान्याची सोय करण्यात यावी. ज्याप्रमाणे मागील काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे, तशी परिस्थिती चित्रपट, नाट्य या सांस्कृतिक  क्षेत्रातील कलावंतावर येऊ नये याकडे सरकारने लक्ष द्यावे. महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र शाहीर परिषद व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या असणाऱ्या दीडशे शाखांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कलाकारांची यादी शासनाला देण्यास आम्ही तयार आहोत. यादीमधील कलाकारांना निःपक्षपाती पणे मदत पोहचविण्यासाठी विनंती सरकारला करण्यात आली आहे. तसेच  महाराष्ट्रात होणारी विविध संमेलने, पुरस्कार सोहळे यांचा निधी कलावंतांच्या मदतीसाठी वर्ग करण्यात यावा, त्यामधून साधारण पाच ते दहा कोटी रुपयांची मदत राज्यातील कलावंत, पडद्यामागील कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांना मदत करावी असे भोईर यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: