नागराज मंजुळेंचा “झुंड’ अडचणीत
अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला “झुंड’ चित्रपट प्रदर्शित होण्यास प्रतिबंध करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 28 मे रोजी सुनावणी होणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन “सैराट’ फेम नागराज मंजुळे यांनी केले आहे. हा खटला हैदराबाद येथील चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी तेलंगणातील मियापूरमध्ये अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रंगा रेड्डी यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.
त्यांनी कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. एनजीओ “स्लम सॉकर फाउंडेशन’चे संस्थापक आणि कोच विजय बरसे यांच्यावर झुंड चित्रपट आधारित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विजयने झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल खेळासाठी प्रोत्साहन दिले आणि वाईट गोष्टींचा नाद लागण्यापासून त्यांना रोखले. ते अखिलेश पॉल याचेही कोच होते. जो गॅंगस्टर ते फुटबॉल खेडाळू बनला होता.
विजय बरसे यांचे जीवनचरित्र अखिलेश पॉलशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. चिन्नी कुमार यांचा दावा आहे की, त्यांनी अखिलेश पॉल यांचे सर्व कॉपीराइट विकत घेतले आहे. त्यांना हे अधिकार चित्रपटासाठी नव्हे तर केवळ वृत्तचित्रसाठी विकायचे आहे. मात्र, नागराज मंजुळे जो चित्रपट बनवत आहे तो कॉपीराइटचे उल्लंघन करतो आहे.