fbpx
Monday, September 25, 2023
MAHARASHTRA

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज

बँकांना राज्य शासनाच्या सूचना – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई, दि.24: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज  मिळणार आहे. याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय देखील जारी केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सहकारमंत्री श्री. पाटील म्हणाले,  दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यतच्या कालावधीसाठी अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेर पुनर्गठन केलेल्या कर्जामधील दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी रुपये 2 लाखापर्यंत थकित व परतफेड न झालेली रक्कम असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची कार्यवाही सुरू झाली. मात्र त्याचदरम्यान देशासह राज्यात कोरोनाचे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाले. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे  कर्जमुक्तीच्या पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीतील काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही.

अंतिम यादीमध्ये नाव असूनही ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा  लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक, सहकारी संस्था, ग्रामीण बँकांमध्ये कर्ज आहे.  या बँकांनी  शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असे गृहित धरुन  यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी  कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: