रेल्वेच्या तिकीट बुकिंगला सुरुवात
मुंबई : चौथ्या टप्प्यातला लॉकडाऊन संपल्यानंतर 1 जूनपासून रेल्वे सेवा काही प्रमाणात सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात विशेष 200 ट्रेन्स 1 जूनपासून धावणार आहेत. त्याचं बुकिंग गुरुवार (21 मे) सकाळी 10 पासून सुरू होईल. यातल्या 50 ट्रेन्स एकट्या मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून जाणाऱ्या असतील. या गाड्या या श्रमिक ट्रेन्स व्यतिरिक्त आहेत. श्रमिक ट्रेन मोठ्या प्रमाणावर धावणार आहेत. यासाठी अनेक नवे नियम करण्यात आले आहेत.रेल्वे स्टेशनवरची हॉटेल्स, फुड स्टॉल्स, बुक स्टॉल्स उघडण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला आहे. ही दुकाने उघडण्यासाठी कार्यवाही सुरू करा असे आदेश रेल्वे विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पण हे करताना काही काळजी घेण्यासही सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
येत्या १ जून पासून रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी जाहीर केला होता. दररोज २०० नॉन एसी गाड्या पहिल्या टप्प्यात धावणार आहेत. त्यामुळे रेल्वेने स्टेशनवरची दुकानेही सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने सर्व व्यवहार ठप्प होता. लोकांच्या हाताला काम नव्हतं. आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.पण दुकाने सुरू करतानाच सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्या. कुणाही ग्राहकाला दुकानात बसून वाढण्याची व्यवस्था करू नका असंही रेल्वे मंत्रालयाने सुचवलं आहे.
यात एकही अनरक्षित डबे नसतील, तिकीट बुक केलं आणि कन्फर्म असेल तरच प्रवास करण्याची आणि स्टेशनवर जाण्याची मुभा आहे.
चादर, ब्लॅंकेट आणि पडदे दिले जाणार नाहीत.
एसी ही मध्यम स्वरूपात असेल.
तिकीट ऑनलाइन करता येईल, बुकिंग काउंटर वर मिळणार नाही.
या ट्रेन्स त्यांच्या नेहमीप्रमाणे थांब्यावर (स्टेशनवर) थांबतील.
तात्काळ किंवा ट्रेनमध्ये तिकीट दिला जाणार नाही.
गाडीत मास्क घालणं बंधनकारक असेल.
थर्मल स्क्रिनिंग म्हणजेच ताप आहे की नाही हे तपासण्यासाठी किमान दीड तास आधी पोहोचणं बंधनकारक आहे.
जर ताप आढळला तर प्रवास करू दिला जाणार नाही, त्याऐवजी पूर्ण पैसे परत दिले जातील.
जेवण पुरवलं जाणार नाही, काही ट्रेन मध्ये आधी बुकिंग केल्यास पाणी आणि मर्यादित वस्तू पुरवल्या जातील.
