fbpx
Thursday, December 7, 2023
MAHARASHTRAPUNE

पुण्याहून परभणीकडं पायी निघालेल्या ऊसतोड मजुराचा अन्न पाण्याविना मृत्यू

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हा स्थलांतरित कामगार आणि मजूरांना बसला आहे. अनेकांचे घराच्या ओढीनं पायपीट सुरु असताना मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी देखील अशीच एक घटना घडली असून एका ४० वर्षीय शेत मजूराचा पायी चालत असताना भूक आणि डिहायड्रेशनमुळं मृत्यू ओढवला आहे. तो पुण्याहून आपल्या गावी परभणीला निघाला होता. इंडियन एक्प्रेसनं पीटीआयच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पिंटू पवार असं या ऊसतोड कामगार तरुणाचं नाव असून सोमवारी बीड जिल्ह्यातील धानोरा येथे त्याच्या परभणी या गावापासून २०० किमी अंतरावर तो मृतावस्थेत आढळला. या तरुणाचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यातून धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे १५ मे रोजी जास्त प्रमाणात चालल्याने भूकेने आणि डिहायड्रेशनने त्याचा मृत्यू झाला. अंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कुकलरे यांनी ही माहिती दिली. हा तरुण परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील धोपटे पोंहडूळ गावचा रहिवासी होता. पुणे जिल्ह्यात ऊसतोड कामगार म्हणून तो काम करीत होता. दरम्यान, लॉकडाउनची घोषणा झाल्यानं खाण्यापिण्याचे हाल व्हायला लागल्यानंतर तो पुण्यात आपल्या भावाच्या घरी राहण्यासाठी गेला. दरम्यान, लॉकडाउन लवकर मिटण्याची चिन्हे दिसेनात त्यामुळे त्याने पायीच आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यानं पुण्याहून ८ मे रोजी आपला प्रवास सुरु केला. दरम्यान, १४ मे रोजी तो अहमदनगर येथे पोहोचला. त्यादिवशी त्याच्याकडं मोबाईल फोनही नव्हता त्यामुळे दुसऱ्या एका व्यक्तीच्या फोनवरुन त्याने आपल्या गावाकडच्या घरी फोन लावला आणि त्याचं कुटुंबियांशी बोलणं झालं.
त्यानंतर तो पुढे बीड जिल्ह्यातील धानोरापर्यंत ३० ते ३५ किमी चालत गेला आणि एका छोट्या शेडखाली विश्रांतीसाठी थांबला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या शेडजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीला कुजका वास आल्याने त्याने पोलिसांना याची खबर दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शेडमध्ये जाऊन पाहिले तर त्यांना पवार हा मृतावस्थेत आढळला. दरम्यान, या तरुणाच्या कुटुंबियांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस आणि धानोराच्या ग्रामपंचायत सदस्यांनी शवविच्छेदनानंतर त्याच्या पार्थिवावर गावातच अंत्यसंस्कार केले.

Leave a Reply

%d