५० टक्के आसनक्षमतेवर पीएमपी बससेवा सुरु करा; काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची मागणी
पुणे – कोरोनामुळे गेल्या चार महिन्यापासून पीएमपीची बससेवा बंद असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत ५० टक्के आसनक्षमतेवर पीएमपी बससेवा सुरु करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आणि पीएमपीएमएल कामगार युनियन इंटकचे सल्लागार गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ श्रवण हार्डीकर, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांना लिहिलेल्या पत्रात गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे की, ‘चार महिन्यापासून पुण्याची पीएमपीएमल वाहतूक सेवा बंद आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागाअंतर्गत काम करत असलेला कर्मचारी वर्ग आणि २ हजाराहून अधिक कर्मचारी वर्ग हा घरी बसून आहे. या अनुषंगाने नियम व अटींवर नागरिकांचे अर्थचक्र फिरत रहावे या उद्देशाने बहुतांश ठिकाणी व्यवसाय, कार्यालये, दुकाने आदी सुरु करण्यात आली आहेत. परंतु, विविध ठिकाणी ये-जा करण्यासाठी वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने सामान्य पुणेकर नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर बससेवा सुरु करायला हवी.
मुंबई (बेस्ट), नागपूर व दिल्ली या मेट्रो शहरातील सार्वजनिक बससेवा सुरु करण्यात आली आहे याच धर्तीवर सुरक्षित अंतर व सर्व नियमांची अंमलबजावणी करुन ही सेवा सुरु करता येईल असेही तिवारी यांनी सुचविले आहे. तसेच बससेवा तातडीने सुरु करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, सर्व कर्मचारी वर्ग घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करेल अशी ग्वाहीही त्यांनी पीएमपीएमल कामगार संघटनेतर्फे गोपाळदादा तिवारी यांनी दिली आहे.
