बंदिश रागविस्ताराला बांधीवपणा देते – पं. विकास कशाळकर यांचे प्रतिपादन
गोपाळ गायन समाज संगीत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित गुरुवर्य पं. गायनाचार्य गोविंदराव देसाई यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधणार्या ‘गोविंद स्वरांजली’ या मैफलीच्या निमित्ताने ते बोलत होते. याप्रसंगी पंडित कशाळकर यांचा संस्थेच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त ७५ ज्योती प्रज्ज्वलित करून सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. राजश्री कशाळकर तसेच गोपाळ गायन समाज संस्थेच्या विश्वस्त डाॅ. अरुणा चाफेकर उपस्थित होत्या.
पंडीत कशाळकर म्हणाले, मी पं. गजाननबुवांकडे रागसंगीत तर शिकलोच, पण बंदिशींविषयीचा विचारही त्यांनी शिकवला. भारतीय रागसंगीतात रागविस्ताराच्या अफाट क्षमता आहेत. सिद्धहस्त कलाकार हे जाणून असतातच, पण मैफल सादर करताना, कुठेतरी वेळेचे भान आवश्यक असते. त्यामुळे नेमक्या वेळात, रागाचे स्वरूप अधिकाधिक खुलवण्यासाठी बंदिशीचा आकृतीबंध गरजेचा ठरतो. बंदिश रागविस्ताराला एक बांधीवपणा, चौकट पुरवते. याशिवाय बंदिश बांधणे, ही वेगळी प्रक्रिया असते. कोणते शब्द वापरावेत, कुठले शब्द टाळावेत, सुगमता कशी आणावी, भाव कसे व्यक्त करावेत, घराण्याची शिस्त, वैशिष्ट्ये बंदिशीत कशी अंतर्भूत करावीत, हाही शिकण्याचा भाग असतो. बुवांनी स्वतः बंदिशी केल्या, आम्हाला त्यासाठी प्रवृत्त केले. त्यातून मी बंदिशी रचल्या आणि अनेक कलाकार त्या सादर करतात, याचा आनंद आहे.
डाॅ. अरुणा चाफेकर म्हणाल्या, पंडित कशाळकर हे सेवाव्रती संगीतसाधक आहेत. सतत संशोधन, नाविन्याचा शोध आणि मोठी शिष्यपरंपरा, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
संस्थेचे माजी विद्यार्थी आणि बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे सुरेश साखवळकर यांनी संस्थेतील शिक्षणाची व गुरुंची माहिती दिली. यावेळी बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे संस्थापक नाना कुलकर्णी यांचा तसेच ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा वयाची शंभरी पूर्ण केल्यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक अभिनेते रवींद्र कुलकर्णी, गायिका मधुवंती देव, अनुराधा मराठे, अरुण धर्माधिकारी, प्रभाकर वैद्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अंजली लाळे यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. अरुणा चाफेकर यांनी आभार मानले. उत्तरार्धात डाॅ. विकास कशाळकर यांनी रचलेल्या बंदिशींची ‘गोविंद स्वरांजली’ ही मैफल रंगली. वैभव दवे, गौरी करंबेळकर, मुग्धा भट, अभिषेक कुलकर्णी, परिमल कोल्हटकर आणि लीना विनोद यांनी सादरीकरण केले. भूपाली, गावती, शामकल्याण, जयतकल्याण, मालगुंजी अशा रागांत डाॅ..कशाळकर यांनी बांधलेल्या या बंदिशींना रसिकांनी भरभरून दाद दिली. पुष्कर महाजन (तबला) आणि मीनल नांदेडकर (हार्मोनिअम) यांनी साथसंगत केली.
गोपाळ गायन समाज संगीत विद्यालय, पुणे यांच्या वतीने गुरुवर्य कै. पं. गोविंद गोपाळ देसाई यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार दी. २० मे रोजी विशेष कार्यक्रम संस्थेच्या सभागृहात दोन सत्रांमध्ये संपन्न झाला.
सकाळच्या सत्रात प्रथम गुरुवर्य पं. गोविंद राव देसाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. नंतर “गोविंद स्वरांजली” या विशेष संगीत कार्यक्रमात वय वर्षे ५० आणि त्या पुढील निवडक १२ कलाकारांना संस्थेच्या व्यासपीठावर आपली गायन कला सादर करण्यासाठी आमंत्रित केले होते.प्रत्येकी १० मिनिटांचा अवधि देऊन शास्रीय संगीतातील बंदिशी सादर करण्याची त्यांना संधी मिळाली.
पहिल्या सत्राची समाप्ती “गोविंद गोपाळ गीत शृंखला” या कार्यक्रमाने झाली. गोविंद आणि गोपाळ हे दोन शब्द असलेली निवडक गीते सादर झाली. यात सहभागी झाले होते संस्थेत संगीत शिकवणारे शिक्षक आणि संस्थेच्या विश्वस्त तसेच कै. गोविंदराव देसाई यांच्या शिष्या डॉ. अरुणा चाफेकर.
