‘सेवा संकल्प – राष्ट्रनिर्माण के 25 साल’ कार्यक्रमात विविध धर्मांचे धर्मगुरू, राजनैतिक प्रतिनिधी आणि क्रीडापटूंचा सहभाग
डॉ. अशोक कुमार मित्तल यांच्या पुढाकाराने नवी दिल्लीत आयोजन; आशियाई क्रीडा स्पर्धांतील भारतीय खेळाडूंचा सन्मान
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांचा प्रवास आणि शासनकार्याचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘सेवा संकल्प – राष्ट्रनिर्माण के 25 साल’ या राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यसभेचे खासदार डॉ. अशोक कुमार मित्तल यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात राजकीय नेते, विविध धर्मांचे धर्मगुरू, राजनैतिक प्रतिनिधी, युवा वर्ग, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि क्रीडापटू सहभागी झाले होते.
सेवा, सामाजिक सलोखा, सुशासन आणि राष्ट्रनिर्माण या विषयांवर केंद्रित असलेल्या या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार संदीप पाठक, लोकसभेचे खासदार जगदंबिका पाल, दिल्ली विधानसभेतील शाहदरा मतदारसंघाचे आमदार संजय गोयल, भाजपचे राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजक दीपक म्हास्के तसेच क्यूएस इंडियाचे अध्यक्ष आणि धोरणात्मक व आंतरराष्ट्रीय सहभाग विभागाचे उपाध्यक्ष डॉ. अश्विन फर्नांडिस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध धर्मांच्या प्रतिनिधींनी एकाच व्यासपीठावर एकत्र येत धार्मिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना, समाजसेवा व सार्वजनिक जबाबदारीविषयी विचारमंथन, माहितीपटाचे सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दिल्ली पारशी अंजुमनचे विश्वस्त मरजबान नरिमन झैवाला, आचार्य सुशील मुनी मिशनचे संस्थापक योगमनीषी आचार्य विवेक मुनीजी महाराज, गुरुद्वारा रकाबगंज साहिबचे मुख्य ग्रंथी ज्ञानी दिलबाग सिंहजी, संत समाज दलाचे अध्यक्ष स्वामी राजेश्वरानंदजी, भारतीय सर्वधर्म संसदचे राष्ट्रीय संयोजक गोस्वामी सुशीलजी महाराज, हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे साहिबजादा जिया निजामी, बुद्धिस्ट कल्चरल फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष भंते दीपांकर सुमेधो आणि बहाई ऑफिस ऑफ पब्लिक अफेयर्सच्या संचालिका कार्मेल त्रिपाठी यांच्यासह विविध धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला निकाराग्वा, चाड, बुरुंडी, लायबेरिया, मादागास्कर, जॉर्डन, रशिया, कॅमेरून, बोत्सवाना, लेसोथो, व्हेनेझुएला, अंगोला, बुर्किना फासो, नायजर आणि इस्रायल या देशांच्या राजनैतिक प्रतिनिधींनीही उपस्थिती लावली.
आशियाई क्रीडा स्पर्धांतील खेळाडूंचा गौरव
कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून देशासाठी योगदान देणाऱ्या खेळाडूंचा सन्मान. डॉ. अशोक कुमार मित्तल आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना गौरविण्यात आले. खेळाडूंची मेहनत, शिस्त आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.
नीरू धांडा, अमन सहरावत, अंतिम पंघाल, सुजीत कलकल, कमलजीत, नितेश सिवाच, पूजा सिंह, किरण पहल, सतनाम सिंह, मनीषा कीर, हिमांशू धिल्लों, साक्षी राणा आणि सलमान खान या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. नेमबाजी, कुस्ती, अॅथलेटिक्स, रोइंग आणि हॉकी यांसह विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंचा यात समावेश होता.
यावेळी बोलताना डॉ. अशोक कुमार मित्तल म्हणाले, “हा केवळ उत्सव नसून सार्वजनिक सेवेसाठी आयुष्यातील मोठा काळ समर्पित केलेल्या व्यक्तीच्या २५ वर्षांच्या प्रवासाचे स्मरण करण्याचा एक संकल्प आहे. गुजरातपासून दिल्लीपर्यंत नरेंद्र मोदी यांचा प्रवास सार्वजनिक जबाबदारी, विश्वास आणि सेवेच्या भावनेशी जोडलेला आहे. मागील २५ वर्षांचा प्रवास स्मरणीय असला, तरी पुढील २५ वर्षांचा विचार करून विकसित, सामर्थ्यवान आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी असलेल्या भारताच्या निर्मितीसाठी सामूहिक संकल्प करण्याची गरज आहे.”
कार्यक्रमात शासनाच्या २५ वर्षांच्या प्रवासावर आधारित गीताचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर सात निवडक युवकांनी पुढाकार घेत ‘सेवा संकल्प’ प्रतिज्ञा दिली. राष्ट्रनिर्माण आणि समाजसेवेची मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता ‘साउंड्स ऑफ सेवा’ या संगीत सादरीकरणाने झाली. भारतातील विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या या सादरीकरणातून एकता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रसेवेचा संदेश देण्यात आला.
भारताची विविधता हीच त्याची ताकद असून, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रसेवेच्या भावनेने कार्य करणे आवश्यक आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
