नवीन स्कोडा स्लाव्हियाच्या उत्पादनाला सुरुवात
मुंबई : स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) पुण्यातील चाकण येथील आपल्या जागतिक दर्जाच्या प्लांटमध्ये नवीन स्कोडा स्लाव्हियाचे उत्पादन सुरू केले आहे, जो ग्रुपच्या भारतातील प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होण्यासह पॅसेंजर वेईकल मार्केटमध्ये खरेदीचा उत्साह असताना नवीन स्लाव्हियाच्या उत्पादनाची सुरुवात करण्यात आली आहे. नवीन स्लाव्हिया भारतातील अत्यंत लोकप्रिय सेदानच्या यशावर आधारित आहे, जी ग्राहकांसाठी अधिक प्रगत डिझाइन, तंत्रज्ञान, आरामदायीपणा आणि सुरक्षितता घेऊन आली आहे.
नवीन स्लाव्हिया आपल्या यशस्वी सेदान परंपरेचा विस्तार करते, ज्या अंतर्गत आजपर्यंत जवळपास ८०,००० युनिट्सची विक्री झाली आहे. ही वेईकल भारतातील ग्राहकांच्या गरजांची सखोल जाण आणि युरोपियन इंजिनिअरिंगचा परिपूर्ण संगम साधण्याचा स्कोडा ऑटोचा दृष्टिकोन अधिक पुढे घेऊन जाते, तसेच देशातील ब्रँडचा सेदान पोर्टफोलिओ अधिक दृढ करते.
स्कोडा ऑटोचे चीफ प्रोडक्शन ऑफिसर आंद्रियास डिक म्हणाले, “भारत हे स्कोडासाठी एक अत्यंत महत्त्वाचे जागतिक उत्पादन केंद्र बनले आहे. स्थानिक कौशल्य आणि जागतिक दर्जाची सांगड घालत आम्ही मोठी क्षमता निर्माण केली असून, नवीन स्लाव्हियाचे उत्पादन हे याच क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. स्कोडाच्या आंतरराष्ट्रीय वाढीत आणि जागतिक कामकाजात भारताचे धोरणात्मक महत्त्व कायम राहील.”
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ पियुष अरोरा म्हणाले, “नवीन स्लाव्हियाच्या उत्पादनाची सुरुवात हा आमच्या भारतातील प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. आकर्षक डिझाइन, सुरक्षा आणि उत्कृष्ट इंजिनिअरिंगमुळे स्लाव्हियाने ग्राहकांमध्ये दृढ स्थान निर्माण केले आहे. पुण्यात उत्पादन सुरू झाल्यामुळे, तंत्रज्ञान आणि आरामदायीपणाच्या महत्त्वाच्या सुधारणांसह ही अद्ययावत आवृत्ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता म्हणाले, “सेदान हा आमच्या जागतिक वारशाचा अविभाज्य भाग असून, नवीन स्लाव्हिया हा वारसा अभिमानाने पुढे नेते. या सेगमेंटमध्ये जवळपास ३०% बाजारासह स्लाव्हियाने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. नवीन स्लाव्हिया क्लासिक डिझाइन, युरोपियन इंजिनिअरिंग, सुरक्षितता आणि प्रगत तंत्रज्ञानाचा परिपूर्ण संगम घडवून आणते. या मॉडेलचे उत्पादन सुरू करून आम्ही भारतातील सेदान वारसा अधिक दृढ करण्यास कटिबद्ध आहोत.”
सणासुदीच्या हंगामासाठी नवीन स्लाव्हिया:
नवीन स्लाव्हिया युरोपियन इंजिनिअरिंग आणि ५-स्टार ग्लोबल एनसीएपी सुरक्षा मानक सातत्याने प्रदान करत आहे. आता यात १.० टीएसआय इंजिनसोबत नवीन एट-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
आराम आणि सोयीसुविधा अधिक उंचावत या नवीन मॉडेलमध्ये सेगमेंटमधील पहिले रिअर सीट मसाज फंक्शन, ३६०-डिग्री एरिया व्ह्यू कॅमेरा आणि गुगल क्लाउड-संचालित एआय कम्पॅनियन असलेले नेक्स्ट-जनरेशन इन्फोटेन्मेंट सादर करण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये सर्वोत्तम ड्रायव्हिंग गतीशीलता, उपयुक्तता आणि सुरक्षिततेचे संयोजन कायम ठेवण्यात आले आहे, ज्याने भारतातील सेदान ग्राहकांमध्ये या वेईकलचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
भारतातील उत्पादन आणि इंजिनिअरिंग क्षमतांचे सक्षमीकरण:
नवीन स्लाव्हियाच्या उत्पादनाची सुरुवात भारतातील एसएव्हीडब्ल्यूआयपीएलच्या प्रस्थापित उत्पादन क्षमतांना दर्शवते. वार्षिक ३,१५,००० युनिट्सची एकत्रित क्षमता असलेल्या दोन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून कंपनीने २०२५ मध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या २ दशलक्ष वेईकल्सचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. आपल्या “मेड इन इंडिया फॉर इंडिया अँड द वर्ल्ड” दृष्टिकोनांतर्गत कंपनीने ४० हून अधिक देशांमध्ये ७,२५,००० हून अधिक वेईकल्सची यशस्वी निर्यात केली आहे.
पुण्यातील विस्तारलेल्या टेक्नॉलॉजी सेंटरच्या पाठबळामुळे ही परिसंस्था भारतातील व जागतिक बाजारपेठांसाठी आवश्यक स्थानिकीकरण, नाविन्यता आणि उत्पादनांचे रुपांतर करण्याच्या एसएव्हीडब्ल्यूआयपीएलच्या क्षमतांना अधिक दृढ करते, तसेच फोक्सवॅगन ग्रुपच्या जागतिक ऑपरेशन्समधील भारताची भूमिका अधिक प्रबळ करते.
