Thursday, October 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘प्लाझ्मा’, ‘प्रेशर मीड’ आणि ‘लेझर लाईट’ला बंदीच हवी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

 

पुणे : गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपणारा हा उत्सव उत्साहात साजरा होत असताना नागरिकांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कायद्याने आणि न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत, ध्वनिप्रदूषण टाळून आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून गणेशोत्सव साजरा करूया, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

गणेशोत्सवातील मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कर्णकर्कश आवाज निर्माण करणाऱ्या प्लाझ्मा आणि प्रेशर मीडसारख्या ध्वनियंत्रणांना पूर्णपणे प्रतिबंध असलाच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मोहोळ यांनी मांडली

लेझर लाईटच्या वापराबाबतही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. लेझरचा अयोग्य किंवा अनियंत्रित वापर नागरिकांच्या डोळ्यांसाठी तसेच रस्त्यावरील वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे गणेशोत्सवात लेझर लाईटचा वापर टाळला पाहिजे, अशी भूमिका मोहोळ यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सवाची भव्यता ही कर्णकर्कश आवाज, मोठमोठ्या साउंड सिस्टीम किंवा धोकादायक प्रकाशयोजनेत नसून गणरायाविषयीची श्रद्धा, आपल्या परंपरांचा सन्मान आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीत आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

पारंपरिक ढोल-ताशा हा आपल्या गणेशोत्सवाच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पारंपरिक वाद्यांवर अनावश्यक निर्बंध लादण्याऐवजी कायद्याने निश्चित केलेल्या ध्वनिमर्यादेत आणि शिस्तीत त्यांचा वापर व्हावा, अशी अपेक्षाही मोहोळ यांनी व्यक्त केली. डीजे किंवा इतर ध्वनिव्यवस्थेबाबतही उत्सव कोणत्याही एका घटकापुरता मर्यादित न ठेवता सर्वांच्या सहकार्याने आणि नियमांच्या चौकटीत साजरा झाला पाहिजे.

गणेशोत्सव हा सर्वांचा उत्सव आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी नागरिकांची गैरसोय, वाहतूक, पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षितता यांचा विचार करून उत्सवाचे आयोजन करावे. उत्साह कायम ठेवूया; मात्र कर्णकर्कश आवाज आणि नियमबाह्य साधनांना आळा घालूया. नियमांचे पालन करून, पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading