Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या हातावर प्रेमाची राखी

पुणे : देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी ऊन, वारा, पाऊस आणि कडाक्याची थंडी यांची पर्वा न करता अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांच्या मनगटावर प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेचा रेशीम धागा बांधत रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा उत्साहात पार पडला. श्री शिवाजी मित्र मंडळ आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या उपक्रमातून जवानांप्रति आदर आणि देशवासीयांच्या भावनिक नात्याची प्रचिती आली.

जवानांना आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागू नये, त्यांना बहिणीच्या प्रेमाची आणि आपुलकीची उणीव भासू नये, या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंडळाच्या माध्यमातून महिला, तरुणी आणि विद्यार्थिनींनी जवानांच्या मनगटावर राख्या बांधून त्यांचे औक्षण केले. यावेळी अनेक भगिनींचे डोळे भावनेने पाणावले, तर जवानांच्या चेहऱ्यावरही आपुलकीचा आनंद दिसून आला.

या प्रसंगी ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तिपर गीत सादर केले. तर गायक राजेश दातार यांनी ‘फुलों का तारों का, सबका कहना है’ हे रक्षाबंधनाचे लोकप्रिय गीत सादर केले. या भावस्पर्शी गीतांनी उपस्थित वातावरण भारावून गेले. गीत ऐकताना अनेक सैनिक आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

“देशाचे रक्षण करणारा प्रत्येक सैनिक हाच आमचा खराखुरा भाऊ आहे,” अशी भावना यावेळी एका विद्यार्थिनीने व्यक्त केली. या उपक्रमातून केवळ जवानांच्या मनगटावर राखी बांधली गेली नाही, तर संपूर्ण देश आपल्या वीर जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा भावनिक संदेशही देण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. त्यामुळे परिसरात देशभक्ती, आपुलकी आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या उपक्रमासाठी ॲडमिन ऑफिसर मेजर प्रमोद जोशी तसेच सब मेजर यू. पी. शुक्ला यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या योगदानाबद्दल आयोजकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र, सन्मानपत्र आणि भेटकार्ड देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी शिवव्याख्याते सौरभ कर्डे, ऋत्विक अद्मुलवार, गंधाली शाह, उमेश शेवते, पूजा कर्डे, आनंदी शेवते आदी उपस्थित होते. साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयूष शाह आणि श्री शिवाजी मित्र मंडळाचे प्रल्हाद भाऊ थोरात यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पीयूष शाह यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading