Tuesday, October 13, 2026
ENTERTAINMENTLatest News

अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ‘तारिणी’ ठरली पहिली मराठी मालिका!

 देशाची सुरक्षा, गुप्त मोहिम आणि देशासाठी स्वतःच्या भावनांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणारी ‘तारिणी’ सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या मिशनवर निघाली आहे. आतापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास करून सत्य समोर आणणाऱ्या तारिणीसमोर आता देशाच्या सुरक्षेशी संबंधित मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ‘ऑपरेशन तिरंगा’ या विशेष मोहिमेसाठी तारिणी अमृतसरला पोहोचली असून, या कथानकाच्या निमित्ताने ‘तारिणी’ मालिकेने भारत पाकिस्तान सीमा, अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करत एक खास टप्पा गाठला आहे.

एका गूढ संदेशापासून तारिणीच्या या नव्या मोहिमेला सुरुवात होते. अमृतसरमध्ये पोहोचल्यानंतर तिचा संपर्क बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी येतो. भारताविरोधात रचल्या जात असलेल्या एका मोठ्या कटाची माहिती तारिणीला मिळते. या कटामध्ये शत्रू देशातील काही महिलांचा सहभाग असल्याचा संशय आहे. या कटाचा शोध घेण्यासाठी तारिणीला आपली खरी ओळख लपवून काम करावं लागणार आहे.तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे तारिणी संशयित सलमापर्यंत पोहोचते. या प्रकरणामागचं महत्त्वाचं रहस्य समोर आल्यानंतर तिच्यासमोर मिशनमधील सर्वात मोठं आव्हान उभं राहतं. देशासाठी तारिणीला स्वतःची ओळख बाजूला ठेवून ‘सलमा’ ही नवी ओळख स्वीकारावी लागणार आहे. प्रत्येक पाऊल धोक्याचं असलेल्या या मोहिमेत कोणत्याही क्षणी तारिणीची खरी ओळख उघड होण्याची शक्यता आहे.

तारिणीची भूमिका साकारणारी शिवानी सोनार या अनुभवाबद्दल सांगितले, “तारिणीने मला आजवर खूप काही दिलं आहे आणि अटारी-वाघा बॉर्डरवर शूट करण्याचा हा अनुभव मी आयुष्यभर विसरणार नाही. शूटिंग सुरू असताना माझी भेट कल्याणी नावाच्या एका तरुण बीएसएफ अधिकाऱ्याशी झाली. तिला माझी भूमिका आणि आमची मालिका तारिणी खूप आवडते असे तिने मला सांगितले.  ती माझ्याशी बोलायला आली,  तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता. कारण आपल्या कामातून देशासाठी काहीतरी योगदान देऊ शकतो, अशी इच्छा माझ्या मनात नेहमीच होती. पण माझ्या कामामुळे ते शक्य होईल का, याची मला कल्पना नव्हती. ‘तारिणी’मुळे मला ही संधी मिळाली, यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. मला ही भूमिका दिल्याबद्दल मी देवाची आणि या संपूर्ण टीमची खूप आभारी आहे. ‘झी मराठी’ची संपूर्ण टीम, एरिकॉन टीम, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, भीमराव मुडे, पीयूष, आमचे लेखक आणि विशेषतः प्रल्हाद कुडतरकर यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि तारिणीची ही भूमिका मला साकारण्याची संधी दिली. भारत पाकिस्तान सीमा अटारी-वाघा बॉर्डरवरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी कायमच खास राहील.”

आता ‘तारिणी’ समोर ‘ऑपरेशन तिरंगा’च्या माध्यमातून देशाला सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. या मोहिमेत तिची खरी ओळख गुप्त राहणार का? आणि या धोकादायक मोहिमेत तारिणीला कोण साथ देणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये उलगडणार आहेत.

तेव्हा बघायला विसरू नका ऑपरेशन तिरंगा ‘तारिणी’ चे हे विशेष भाग सोम शुक्र रात्री ९:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading