Tuesday, October 13, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांचे १०१ व्या वर्षी निधन

पुणे : मराठी भाषेच्या अभ्यासक, ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ आणि भाषावैज्ञानिक डॉ. यास्मिन शेख यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या. मराठी व्याकरण, शुद्धलेखन, भाषाविज्ञान आणि मुद्रितशोधन या क्षेत्रांत त्यांनी प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान दिले.
२१ जून १९२५ रोजी रायगड जिल्ह्यातील पेण येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुशा जॉन रुबेन होते. त्या ज्यू समाजातील होत्या. १९५० मध्ये नाशिक येथील अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला. विवाहानंतर त्यांनी ‘यास्मिन शेख’ हे नाव स्वीकारले. मात्र नाव बदलले असले तरी त्यांनी आपला धर्म बदलला नाही.
शिक्षण क्षेत्रातही डॉ. शेख यांनी मोठी कामगिरी बजावली. तब्बल ३४ वर्षे त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापन केले. मुंबईतील एसआयईएस महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. प्रशासकीय सेवांच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनाही त्यांनी मराठी व्याकरणाचे मार्गदर्शन केले.
मराठी भाषेतील शुद्धलेखन आणि लेखनशैली अधिक प्रमाणबद्ध करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. ‘मराठी शब्दलेखनकोश’ हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक असून त्याची पहिली आवृत्ती २००७ मध्ये प्रकाशित झाली, तर सुधारित आवृत्ती २०१५ मध्ये प्रसिद्ध झाली. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ यासह व्याकरण, शुद्धलेखन आणि भाषाविषयक त्यांचे विपुल लेखन प्रसिद्ध आहे.
वयाची शंभरी ओलांडल्यानंतरही डॉ. यास्मिन शेख यांचा मराठी भाषेच्या अभ्यासातील उत्साह कायम होता. त्यांच्या दीर्घकालीन भाषासेवेचा गौरव म्हणून २०२५ मध्ये त्यांना ‘मराठी भाषा जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मराठी भाषेच्या शुद्धलेखन, व्याकरण आणि प्रमाणभाषेच्या विकासासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषा आणि साहित्य क्षेत्रातील एक ज्येष्ठ अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading