Wednesday, August 26, 2026
Latest NewsPUNE

कसबा पेठेत कौटुंबिक वादातून गोळीबार; पती जखमी


पुणे : कसबा पेठ परिसरातील भैरवनाथ मंदिराजवळ सोमवारी पती-पत्नीमधील कौटुंबिक वादातून गोळीबाराची घटना घडली. या घटनेत पतीच्या उजव्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्याने स्वतःवरच गोळी झाडली की गोळीबाराची घटना वेगळ्या प्रकारे घडली, याबाबत फरासखाना पोलिसांना संशय असून त्या दिशेने तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. वाद वाढल्यानंतर दोघांनीही एकमेकांना गोळी मारण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचे तपासात समोर आले आहे. पत्नीने पतीला स्वतःला गोळी मारण्यास सांगितल्याचे, तर पतीनेही पत्नीला आपल्यावर गोळी झाडण्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याचदरम्यान गोळीबार झाला आणि पतीच्या उजव्या हाताला गोळी लागली.
घटनेनंतर जखमी पतीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्नीही घटनास्थळावर न थांबता रुग्णालयात गेल्याची माहिती आहे. तिची चौकशी केल्यानंतर घटनेमागील नेमके कारण आणि गोळीबाराची परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग, एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शस्त्रासह संबंधित पुरावे ताब्यात घेतले आहेत.
पती-पत्नीमध्ये वाद नेमका कशावरून झाला, पिस्तूल कोणाच्या ताब्यात होते, गोळी कोणी झाडली आणि नेमक्या कोणत्या परिस्थितीत पती जखमी झाला, याचा फरासखाना पोलीस तपास करीत आहेत. पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे या घटनेचे सत्य उलगडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading