नृत्यप्रस्तुतीतून द्वैतभावापलीकडे नेणारे भावोत्कट सादरीकरण
नृत्यांगना डाॅ. स्वाती दैठणकर यांचे संहितालेखन, नृत्यसंरचना आणि प्रस्तुती
पुणे – नृत्यप्रस्तुतीतून मनातील द्वैतभावाचा निरास करून अद्वैताचा साक्षात्कार घडू शकतो. अशा परमोच्च आकलनापर्यंत रसिकांना नेण्याचा प्रयत्न करणारी नर्तन कीर्तनम् ही प्रस्तुती रविवारी रसिकांची भरभरून दाद मिळवणारी ठरली. वैष्णव परंपरेतील संतकवी श्री रूप गोस्वामी यांच्या भक्तीरसपूर्ण आणि तत्त्वज्ञानपर रचनांचा आशय भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून रसिकांना भेटला आणि त्या भक्तीमय वातावरणात रसिक गुंतून गेले.
प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्यगुरू, नृत्यसंरचनाकार डाॅ. स्वाती दैठणकर यांनी आपल्या शिष्यांसह ही प्रस्तुती साकारली. अमेरिकास्थित श्री राधा माधव फाईन आर्ट्स कल्चरल सोसायटीचे आशिषकुमार आणि नुपूरनाद अकडमी यांच्यातर्फे कर्वे रस्त्यावरील मयूर कालनी येथील बालशिक्षण मंदिर सभागृहात रविवारी सायंकाळी नर्तन कीर्तनम् सादर झाला. या कार्यक्रमासाठी रसिकांना मुक्त प्रवेश होता. स्वतः डाॅ. स्वाती दैठणकर, नुपूर दैठणकर यांच्यासह प्राजक्ता बापट, राजलक्ष्मी बागडे, गौरी बुर्डे आणि प्रांजली गोरे या शिष्यांचा सादरीकरणात सहभाग होता. नर्तन कीर्तनम् ची संहिता, नृत्यसंरचना, सादरीकरण डाॅ. स्वाती दैठणकर यांची तर, संगीत डाॅ. धनंजय दैठणकर यांचे होते. संगीतरचना प्रामुख्याने कर्नाटक संगीतावर आधारित होत्या.
प्रारंभी दैठणकर यांच्या चार शिष्यांनी श्री रूप गोस्वामी यांच्या रचनांवर आधारित प्रस्तुतीत गजेंद्रमोक्षकथा, गोवर्धनकथा तसेच आनंद अष्टकम् अशा संस्कृत रचनांचा त्यांना प्रतीत झालेला अर्थ विवेचनातून आणि नंतर समूह नृत्यातून उलगडला. यापूर्वी डाॅ. दैठणकर यांनी सादर केलेल्या ‘दान केली कौमुदी’ या प्रस्तुतीविषयीचे विवेचनही या कार्यक्रमात सादर झाले.
डाॅ. दैठणकर म्हणाल्या, श्री रूप गोस्वामी हे वैष्णव परंपरेतील ज्येष्ठ दार्शनिक, आचार्य आणि संतकवी १६ व्या शतकात होऊन गेले. वैष्णव संप्रदायातील अनेक ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्याच संस्कृतमधील रचनांचे संकलन ‘स्तवमाला’ आणि ‘उपदेशामृत’ या ग्रंथात आहे. याच दोन ग्रंथांतील संस्कृत रचना नृत्यमाध्यमातून सादर करण्यात आल्या. विशेषतः नव्या पिढीतील प्रेक्षकांना नृत्यासारख्या आकर्षक माध्यमातून भक्ती संकल्पनेचा आणि भक्तीचे परमोच्च स्वरूप जाणून घेता यावे, असा प्रयत्न आहे. मनोरंजनासह रोचक, रसपूर्ण तरीही आशयघन, असे काही या प्रस्तुतीमधून जेन झी पर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. अमूर्ताला मूर्तरूप देत असतानाच, पुन्हा निराकाराकडे सूचन करण्याचा हा एक प्रयास आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात स्वाती आणि धनंजय दैठणकर या कलावंत दांपत्याशी राजलक्ष्मी माने यांनी संवाद साधला. नुपूरनाद संस्थेचा नर्तन कीर्तनम् हा १९ वा कला प्रकल्प आहे. मात्र, कधीच काही ठरवून केले नाही. लहानपणापासून भरतनाट्यम् शिकायचे आणि नृत्य सादर करायचे, हे माझे स्वप्न होते. ते साकारण्याचे भाग्य मला मिळाले. धनंजय यांच्या रूपाने कलागुणांची कदर करणारा कलावंत जोडीदार मिळाला आणि अनेक प्रकल्पांचे संकल्प आणि प्रस्तुती शक्य झाली. नृत्य आपल्याला घडवते, ऊर्जा देते, आपण कोणत्या नजरेने कला माध्यमाकडे पाहतो, हे महत्त्वाचे असते, असे त्या म्हणाल्या. धनंजय यांनी सर्व प्रकल्पांचे संगीत करताना हे नृत्यासाठीचे संगीत आहे, हा विचार केंद्रस्थानी ठेवून काम केले. मी एकट्याने नव्हे तर अनेकांनी एकत्रितपणे काम केले, असे सांगितले. भरतनाट्यम् ही दाक्षिणात्य नृत्यशैली असल्याने यावेळी कर्नाटक शैलीचे राग आणि लयकारीचा विचार प्राधान्याने केला, असेही ते म्हणाले.
स्वाती यांनी सूरदासांच्या ‘जबसे बिछुडे कुंजविहारी’ या रचनेवर एकल नृत्यप्रस्तुती केली. द्वैतभाव असल्याने सुरवातीला विरहिणी राधा कृष्णासाठी व्याकुळ होते, मात्र योग्य वेळी आर्तता पराकोटीला पोहोचल्यावर कृष्ण स्वतःमध्येच असल्याचा साक्षात्कार तिला होतो आणि अद्वैत उमगते, अशा आशयाची ही रचना त्यांनी भावोत्कट अभिनयातून दर्शवली. कृष्णतत्त्वाशी एकरूपत्व जोडणार्या तिल्लाना रचनेने या रंगतदार नृत्यप्रस्तुतीची सांगता झाली.
