मला पंखच नाहीत तर ते छाटणार काय आणि कोण… ?
मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल
मुंबई प्रतिनिधी
नागपूर दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानात भेटले तेव्हा ते हतबल झालेले दिसले. त्यांचे पंख छाटले जात आहेत याची जाणीव त्यांना झाली असावी, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. त्यावर प्रत्युतर देताना देवेंद्र फडणवीस यांनी, मी माणूस आहे. मला पंखच नाही. मग ते काय छाटणार आणि कोण, असा सवाल फडणवीस यांनी केला.
नागपूर दौऱ्याला जाताना ठाकरे व फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला. याबद्दल राजकीय आणि माध्यमांच्या वर्तुळात चर्चांना उधाण आले. या प्रवासाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, फडणवीस जेव्हा विमानात येऊन बसले तेव्हा त्यांचा आत्मविश्वास हरवलेला दिसला. त्यांच्यामध्ये हातबलचा दिसून आली. आपले पंख छाटले जात आहेत आणि छाटणारे आपलेच आहेत, अशी जाणीव त्यांना झाली आहे, असे ठाकरे म्हणाले.
मध्यप्रदेशात भारतीय जनता पक्षाने शिवराजसिंह चौहान यांच्यामुळे विजय मिळवला. मात्र, उद्या ते पक्षाध्यक्ष होतील किंवा पंतप्रधान पदाचे दावेदारही होतील, हे लक्षात घेऊन त्यांना मामा मामा म्हणत मामा बनवले. आता त्यांचे कुठे नावही घेतले जात नाही. जेष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बाबतीतही तेच केले. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही तोच कित्ता गिरवला जात आहे. हे त्यांना जाणवत असल्याचे देहबोलीवरून दिसून आले. ते मुख्यमंत्री आहेत असे वाटतही नव्हते, असा दावा ठाकरे यांनी केला.
याला प्रत्युतर देताना ठाकरे विमानाच्या एका कोपऱ्यात बसले होते तर दुसऱ्या कोपऱ्यात तुम्ही बसलो होतो. सवयीप्रमाणे मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेले चित्रपट आणि वेबसिरीज बघत होतो. विमानात बसल्यापासून उत्तरेपर्यंत माझे तेच काम चालू होते. ठाकरे आणि मी शेजारी असतो तर काही गप्पा मारल्या असत्या. मात्र, तसे काही नसताना ठाकरेंना हे सगळे कधी दिसले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सगळ्याच गोष्टीचा मी राजकीय दृष्टीने विचार करत नाही. लोकांच्या भल्याचा विचार मी आधी करतो. राजकारणातील कुरघोड्यांनी कोणाचे भले होत नाही. राज्यातील 14 कोटी जनतेचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे. माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. ठाकरे यांनी आता माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या सदिच्छा सन 2019 मध्ये व्यक्त केल्या असत्या तर चित्र वेगळे दिसले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
