Thursday, May 21, 2026
BusinessLatest News

भारतातील पहिले खासगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाइन केंद्र विशाखापट्टणममध्ये उभारण्यासाठी ‘भारत फोर्ज’चा आंध्र प्रदेश सरकारशी करार

 पुट्टपर्थी  : ‘भारत फोर्ज लिमिटेड’ने आपल्या एअरोस्पेस व्यवसायाअंतर्गत आंध्र प्रदेश सरकारसोबत एक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या कराराअंतर्गत विशाखापट्टणम येथे ‘आंध्र प्रदेश डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉरिडॉर’मध्ये सुमारे ८० एकर क्षेत्रात मरीन गॅस टर्बाइनची (एमजीटी) दुरुस्ती, त्याचे ओव्हरहॉल आणि त्यासंबंधीचे स्वदेशी विकास संकुल उभारण्यात येणार आहे. भारतात खासगी क्षेत्रातील हा अशा स्वरुपाचा पहिलाच प्रकल्प आहे. पुट्टपर्थी येथे आयोजित ‘एअरोस्पेस अँड डिफेन्स इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह’मध्ये ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे एअरोस्पेस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरु बिस्वाल यांनी हा सामंजस्य करार केला. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. या कार्यक्रमात भारताच्या एएमसीए पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान प्रकल्पाच्या पायाभरणीचाही सोहळा पार पडला.

विशाखापट्टणममधील ही सुविधा नौदल डॉकयार्ड, आयएनएस एक्सिला आणि ईस्टर्न नेव्हल कमांड मुख्यालय यांच्या परिसरात उभारली जाणार आहे. प्रथमच अशा महत्त्वाच्या प्रोपल्शन देखभाल क्षमतांचा समावेश भारताच्या खासगी क्षेत्रात होणार आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण मरीन गॅस टर्बाइन दुरुस्ती आणि ओव्हरहॉल संकुल उभारले जाणार आहे. यामध्ये ब्लेड्स, व्हेन्स आणि कंबश्चन लाइनर्स यांच्या हॉट सेक्शन पुनर्बांधणीचे काम, तसेच कॉम्पोनन्ट्सचे उत्पादन, एनडीई प्रयोगशाळा, त्याचबरोबर विशाखापट्टणम नौदल डॉकयार्डसाठी ७२ तासांच्या आत दुरुस्ती व सेवा पूर्ण करण्याची क्षमता या गोष्टी विकसित करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात भारतातील खासगी क्षेत्रातील पहिले मरीन गॅस टर्बाइन विकासाची सुविधा आणि असेंब्ली हॉल उभारले जाईल. तसेच सर्व प्रकारच्या प्रोपल्शन क्षमतांसाठी विस्तार करता येईल अशी अत्याधुनिक हॉट टेस्ट सुविधा तयार करण्यात येणार आहे. याचबरोबर भारतात प्रथमच स्वदेशी मरीन गॅस टर्बाइनचा विकास आणि पात्रतेच्या चाचण्या येथे केल्या जाणार आहेत. ही सुविधा मैत्रीपूर्ण देशांच्या नौदलांसाठी प्रादेशिक दुरुस्ती आणि ओव्हरहॉल केंद्र म्हणूनही काम करणार असून, यामुळे येथे सुमारे ७५० थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

“हे प्रकल्प तिन्ही संरक्षण दलांच्या गरजा पूर्ण करतील आणि भारताला संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रयत्नांना बळ देतील. एअरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून आंध्र प्रदेश उदयास येण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.”

— राजनाथ सिंहसंरक्षणमंत्रीभारत सरकार — पुट्टपर्थी१५ मे २०२६

“नव्या आंध्र प्रदेशाची उभारणी नवकल्पना, पायाभूत सुविधा आणि औद्योगिकीकरण या स्तंभांवर होत आहे. आपला देश ‘विकसित भारत’ या संकल्पनेच्या दिशेने वाटचाल करीत असताना, आंध्र प्रदेश त्यात आघाडीवर राहील.”

— एन. चंद्राबाबू नायडूमुख्यमंत्रीआंध्र प्रदेश — पुट्टपर्थी१५ मे २०२६

“भारताच्या युद्धनौका अनेक वर्षे परदेशात तयार झालेल्या इंजिनांच्या बळावर कार्यरत होत्या. विशाखापट्टणममधील या प्रकल्पामुळे ते परावलंबित्व आता संपणार आहे. भारत फोर्जचा एअरोस्पेस विभाग प्रथमच खासगी क्षेत्रातून भारतात मरीन गॅस टर्बाइनची दुरुस्ती, ओव्हरहॉल आणि स्वदेशी विकासासाठीची सुविधा उभारत आहे. विशेष बाब अशी की या इंजिनांवर अवलंबून असलेल्या नौदल कमांडजवळच हा प्रकल्प उभारला जात आहे. ही केवळ गुंतवणूक नसून भारतीय नौदल आणि देशाप्रती असलेली आमची बांधिलकी आहे.

— अमित कल्याणीउपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालकभारत फोर्ज लिमिटेड

भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकांच्या प्रोपल्शन व्यवस्थेचा मुख्य आधार गॅस टर्बाइन्स आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत या इंजिनांसाठीच्या परदेशी पुरवठा साखळीमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले. त्याचा थेट परिणाम नौदलाच्या दुरुस्ती आणि ओव्हरहॉल कामांवर तसेच कार्यक्षमतेवर झाला. भारत फोर्ज उभारत असलेली ही सुविधा देशासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ‘सशक्त भारत – सुरक्षित भारत’ या संकल्पनेला बळ देत ‘विकसित भारत २०४७’च्या दिशेने टाकलेले हे एक निर्णायक पाऊल असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading