Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

मतदार याद्यांमधील दुबार नावे हटवण्यासाठी अरुण पवार यांचा पाठपुरावा

पिंपरी : निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि मतदार याद्यांमधील बोगस व दुबार नावांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांनी प्रशासनाकडे आपला लढा अधिक तीव्र केला आहे. या संदर्भात मतदार यादी आधार कार्डाशी लिंक करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत.
अरुण पवार यांच्या वतीने विधानसभा मतदारसंघ क्र. २०५ चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. अरुण पवार यांचे प्रतिनिधी मालोजी भालके व श्रीकृष्ण जाधवर यांनी हे निवेदन दिले.
अरुण पवार यांनी निवेदनात म्हटले आहे, की मतदार यादी आधार लिंकिंग अनिवार्य केल्यास एका व्यक्तीचे एकाच मतदारसंघात नाव राहील. पर्यायाने दुबार नावांची तत्काळ ओळख पटवून बोगस नोंदणी रोखता येईल. आधार लिंकिंगमुळे कोट्यवधी दुबार नावे कमी होतील. तसेच बोगस मतदानालाही आळा बसेल. दुबार नोंदींची कडक पडताळणी करून त्या कायमच्या रद्द कराव्यात. दुबार नावे आढळल्यास निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदाराशी संपर्क साधून केवळ त्याच्या सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणीच नाव कायम ठेवावे.
पवार यांनी सांगितले, की पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. येथील मतदार याद्या आदर्श असाव्यात, यासाठी आपला लढा सुरू आहे. आधार लिंक केल्यास निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येईल. याबाबत
भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, महापालिका आयुक्त यांनाही निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading