‘डेक्कन जिमखाना करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेचे १४ मे पासून आयोजन !!
पुणे : पुण्यातील मानांकित आणि सर्वात जुन्या क्लबपैकी असलेल्या डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने ‘डेक्कन जिमखाना करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ मे ते २४ मे २०२६ या कालावधीत डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर होणार आहे.
स्पर्धेत यजमान डेक्कन जिमखाना संघ, पुना क्लब, पारसी जिमखाना, पीवायसी हिंदू जिमखाना, आर्यन्स क्रिकेट अकॅडमी, युनायटेड स्पोर्ट्स क्लब, सहारा पुणेरी बाप्पा आणि ग्लोरी स्पोर्ट्स हे संघ विजेतेपदासाठी झुंझणार आहेत, असे श्री. मृगांक राठी यांनी सांगितले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निमंत्रित स्पर्धेत सहभागी झालेले आणि एलिट ग्रुपमध्ये असणारे हे सर्व क्लब या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. यामुळे या स्पर्धेमध्ये विजेतेपदासाठी चुरस दिसणार आहे.
स्पर्धेचे सामने साखळी आणि बाद फेरीमध्ये खेळवण्यात येणार आहेत. सहभागी ८ संघ चार-चार अशा दोन गटांमध्ये विभागले गेले असून साखळी फेरीत अव्वल कामगिरी करणारे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेचे सामने व्हाईट चेंडूवर होणार असून प्रत्येक सामना २०-२० षटकांचा असणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २४ मे रोजी होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक देण्यात येणार आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी पारितोषिके देण्यात येणार असून प्रत्येक सामन्याचा सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल स्पर्धेत असणार आहे.
