Saturday, April 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

बाह्यरूपे बदलली तरी शाश्वत जिनालय संकल्पना हाच जैन गुंफा मंदिरांचा गाभा – डॉ. अरविंद जामखेडकर

पुणे : जैन मंदिरांचा प्रवास प्रतीकरूप पूजनापासून सुरू झाला आणि अनेक शतकांची वाटचाल करत महाप्रासादनिर्मितीपर्यंत तो विकसित होत गेला. साध्या, अनलंकृत मंदिरांची परिणती बहुमजली, शिल्पखचित अशा मंदिरसमूहांमध्ये झाली. मात्र, मूळ गाभा शाश्वत जिनालयाचा राहिला, असे उद्गार ज्येष्ठ प्राच्यविद्यातज्ज्ञ, मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्ट, आर्कीटेक्चर अँड डिझाईन या अभिमत विद्यापीठाचे कुलपती, आणि राज्य पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाचे माजी संचालक डाॅ. अरविंद जामखेडकर यांनी शनिवारी येथे काढले. इंडी हेरीटेज व परिमल अँड प्रमोद चौधरी फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मास्टर क्लास उपक्रमांतर्गत डॉ. अरविंद जामखेडकर यांचे ‘जैन मंदिर स्थापत्य व मूर्तिशास्त्र’ याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. बीएमसीसी महाविद्यालयाजवळ असलेल्या फिरोदिया होस्टेलच्या सभागृहात शनिवारी सकाळी हे व्याख्यान संपन्न झाले. श्रोत्यांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य खुला होता.

ज्येष्ठ मूर्तिशास्त्रज्ज्ञ डाॅ. गो. बं. देगलूरकर, परिमल अँड प्रमोद चौधरी फाऊंडेशनच्या परिमल चौधरी, श्री बालाजी विद्यापीठ, पुणेच्या लिबरल आर्टस विभागाच्या प्राचार्य डाॅ. प्रीती जोशी, टीमवीच्या डाॅ. मंजिरी भालेराव, डाॅ. मनीषा पुराणिक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी डाॅ. जामखेडकर यांचा प्राचीन वारसा जतन, संशोधन व संवर्धन यासाठी दिलेल्या प्रदीर्घ योगदानासाठी  डाॅ. देगलूरकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना डाॅ. देगलूरकर म्हणाले, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती आहे. संस्कृती ही संज्ञा नदीप्रमाणे सतत वाहती असते. काळाच्या ओघात या प्रवाहात अनेक नवे, वेगळे प्रवाह मिसळून मूळ प्रवाह समृद्ध करत असतात. अशा संपन्न संस्कृतीच्या अभ्यासात, संशोधनात डाॅ. जामखेडकर प्रदीर्घकाळ गुंतले आहेत. जैन मूर्तींचा त्यांनी केलेला अभ्यास महत्त्वाचा आहेच, पण या विषयावर अधिकारवाणीने तेच विवेचन करू शकतात. हा वारसा टिकवायचा असेल, तर आपण जागरुक राहायला हवे. वारसा जतन ही नागरीक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती आपण निभावली तरच पुढच्या पिढ्या त्याचे अनुकरण जाणीवपूर्वक करतील.

पारदर्शिकांच्या साह्याने डाॅ. जामखेडकर यांनी मंदिर संकल्पनेची निर्मिती, प्रवास आणि विकास याविषयी विवेचन केले. पूर्वार्धात मंदिर संकल्पनेचा उगम, मूर्तीची प्रारंभिक रूपे – जी मातृदेवतांच्या रुपाने दिसतात. मंदिरांचे वाड्मयीन उल्लेख, नाण्यांवरील अंकन, उत्खनित अवशेष आणि साध्या रूपातील मंदिरांची निर्मिती, विटांची, लाकडाची, पाषाणांची सुरवातीची मंदिरे यांची माहिती देताना वेदऋचांतील उल्लेख, यौधेय नाण्यावरील अंकन, तेर येथील उत्खननातील गजपृष्ठाकार त्रिविक्रम मंदिर, गुप्तकाळातील मंदिरे, एरण येथील गरुडस्तंभ, चक्रध्वज, मंदिरांच्या उभारणीत होत गेलेले स्थापत्य क्षेत्रातील बदल, विकास..यांचे विवेचन डाॅ. जामखेडकर यांनी केले.

जैन मंदिरे व मूर्ती, याविषयी माहिती देताना जामखेडकर यांनी प्रतीकरूप पूजनापासून ते प्रासादरूपातील अतिभव्य जैन मंदिरांचा प्रवास उलगडला. जैन तत्त्वज्ञानातील उल्लेखांनुसार जग शाश्वत आहे. तीर्थंकरही शाश्वत, त्यांची मंदिरेही शाश्वत मानली जातात. आपल्याकडे प्रचलीत विश्वरूपाप्रमाणेच शाश्वत जिनालयांची संकल्पना पुढे आल्याचे ते म्हणाले. विविध तीर्थकल्प, प्रबोधचिंतामणी आणि त्रिषष्ठी शलाकापुरुषचरित या जैन ग्रंथांचे दाखले देत, जामखेडकर यांनी जैन मूर्ती, तीर्थंकर आणि जैन गुंफा मंदिरांची माहिती देणार्या माऊंट अबू, एलोरा, धाराशिव गुंफा, कुंभारिया मंदिर समूह तसेच कैलास येथील शाश्वत जिनालय यांची माहिती दिली.

काही युरोपियन अभ्यासक भारतीय मंदिर स्थापत्य हे ग्रीक, रोमन स्थापत्याचे प्रभाव स्वीकारून विकसित होत गेले, अशी मांडणी करतात.  मात्र,  त्यात अजिबात तथ्य नाही. भारतीय मंदिर स्थापत्य संपूर्णपणे एतद्देशीय होते. खंडप्राय भूरचनेनुसार व हवामानाप्रमाणे अनुकूल असे स्थापत्यशास्त्रीय घटक मंदिर उभारणीमध्ये अंतर्भूत होत गेले, असे स्पष्टीकरण जामखेडकर यांनी केले.

इंडी हेरीटेजचे संस्थापक तुषार जोशी यांनी स्वागतपर प्रास्ताविकात मास्टर क्लास उपक्रमाची माहिती दिली. डाॅ. प्रीती जोशी यांनी डाॅ. जामखेडकर, डाॅ. देगलूरकर, परिमल चौधरी यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading