महापुरुषांच्या प्रेरणादायक स्मृती जागवणाऱ्या उपक्रमांच्या आयोजनासाठी समिती स्थापन करण्याचे उपमहापौरांचे आदेश
महात्मा फुले जन्म द्विशताब्दी व चवदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
पुणे प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्मद्वीशताब्दी, चवदार तळे सत्याग्रहाची शताब्दी आणि महात्मा फुले यांच्या नगरसेवक पदाची दीडशे वर्ष या निमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे व उपक्रमांचे आयोजन करण्यास स्थायी समितीने मान्यता सर्वसाधारण सभेत दिली असून या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सभापती पदावर असताना दिले आहेत.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्मद्वीशताब्दी, चवदार तळे सत्याग्रहाची शताब्दी आणि महात्मा फुले यांच्या नगरसेवक पदाची दीडशे वर्ष यामुळे हे वर्ष सामाजिक सुधारणा वर्ष म्हणून साजरे करावे. महात्मा फुले आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीने सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जावे, अशी सूचना परशुराम वाडेकर यांनी केली होती. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या प्रस्तावावर चर्चा करत असताना सभेच्या अध्यक्षपदी वाडेकर होते.
त्याचप्रमाणे, नाना पेठ येथील ‘दि डीप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेला दिलेल्या महापालिकेच्या जागेचा करार संपुष्टात आला असून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेबरोबरच्या कराराचे नूतनीकरण करावे, या प्रस्तावालाही स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
संबंधित जागेत डॉ बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, ज्योतिराव फुले मुलींचे हायस्कूल व ज्योतिराव फुले हायस्कूल चालवले जात आहे. या संस्थेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाखेरीज अन्य कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही. त्यामुळे या संस्थेला देण्यात आलेली जागा कायम ठेवण्यात यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे. तसेच ही वास्तू ऐतिहासिक असून याच ठिकाणी महात्मा फुले यांनी शाळा स्थापन केली. या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वावर राहिला आहे.
