वेरूळ लेण्यांचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या ‘एलोरामा’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
पुणे : युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आणि स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणून सर्वपरिचित असलेले छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळचे कैलास मंदिर आणि जैन व बौद्ध लेण्यांवर अनेक अंगांनी प्रकाश टाकणारी छायाचित्रे पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ललित कला अकादमीचा पुरस्कार विजेते छायाचित्रकार नीलेश काळे यांनी पॅनोरामा प्रकारात काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे. येत्या मंगळवार दि. २८ एप्रिल ते रविवार दि. ३ मे दरम्यान घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कला दालनात या ‘एलोरामा’ नावाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ ते सायं. ७ वाजे दरम्यान याचा अनुभव पुणेकरांना घेता येता येणार आहे. सदर प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल याची कृपया नोंद घ्यावी.

एलोरामा या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी सायं. ५ वाजता जागतिक कीर्तीचे मूर्तीशास्त्रज्ञ आणि कैलास मंदिरावरील तज्ज्ञ असलेले डॉ. गो. बं. देगलूरकर, राज्यसभेच्या खासदार प्रो. मेधा कुलकर्णी आणि प्रसिद्ध कलाकार जयंत जोशी यांच्या हस्ते संपन्न होईल. यावेळी डॉ. गो. बं. देगलूरकर हे उपस्थितांशी संवाद साधतील. उद्घटनानंतर सदर प्रदर्शन हे रसिकांना पाहण्यासाठी खुले केले जाईल. याबरोबरच प्रदर्शनादरम्यान गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी सायं ५ वाजता इंडोलॉजिस्ट असलेले डॉ. राहुल देशपांडे हे देखील उपस्थितांशी ‘एक्स्प्लोरिंग एलोरा’ या विषयावर संवाद साधतील. हे दोनही कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

छायाचित्र प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती देताना नीलेश काळे म्हणाले, “राष्ट्रकुटांनी कोरलेल्या वेरूळ मधील या कैलास मंदिराचा कालखंड इ.स. ७५६ ते इ.स. ७७३ च्या दरम्यानचा आहे. सुमारे २ किमीच्या या परिसरामध्ये या ३४ गुंफा कोरलेल्या आहेत. त्यातलं क्रमांक १६ चं लेणं, कैलासमंदिर हे एकाच खडकातून कोरलेलं जगातलं सर्वात मोठं अखंड देऊळ म्हणजे मोनोलिथीक मंदिर म्हणून ओळखल्या जाते. येथील वेरूळ लेण्यांवर आणि त्यातही त्यातल्या कैलास मंदिरावर अनेक अंगांनी प्रकाश टाकणारी छायाचित्रं एलोरामा या प्रदर्शनात पहायला मिळतील. ‘फोटोग्रॅमी’ किंवा ‘फोटोग्रॅमेट्री’ या तंत्राचा वापर करून काढलेल्या असंख्य छायाचित्रांपैकी निवडक अशा छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शनामध्ये करण्यात आला आहे. शिवाय या तंत्राच्या वापराने फोटोंपासून बनवलेले अचूक थ्रीडी (त्रिमिती) मॉडेल हे या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे.”
थ्री डी व्हिस्टा आणि क्लाऊड कम्पेअर तंत्रज्ञानाच्या मदतीने ही लेणी कुठून पाहायला सुरुवात करावी, प्रत्येक टप्प्यावर नेमके काय बघावे, जे बघतो त्याची वैशिष्ट्ये कोणती, त्याचं वेगळेपण कशात आहे, त्याची अचूक लांबी – रुंदी – उंची किती आहे या सर्वांची माहिती या प्रदर्शनात मिळणार असून या जागतिक वारश्याची एक ‘संचलित सफर’ अर्थात ‘व्हर्च्युअल टूर’ या दरम्यान उपस्थितांना मिळेल, असा विश्वासही काळे यांनी व्यक्त केला.
