Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि पादुकांचे दर्शन खुले

पुणे : श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन पुण्यातील भक्तांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे या दोन्हींचे दर्शन इतिहासात प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर भक्तांना घेता येत आहे.

श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर यांच्या माध्यमातून आज (१९ मार्च) सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सूर्यमणी व पादुका एरंडवणे १०० फूट डी. पी रस्त्यावरील सिद्धी – साज बँक्वेट येथे दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. या आधी (१७ मार्च) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सूर्यमणी व पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या, यानंतर पुढे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ मठ आणि श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग येथे भेट देत त्या सिद्धी – साज बँक्वेट येथे दर्शनासाठी आणण्यात आल्या, १८ मार्च रोजी भक्तांनी सिद्धी – साज बँक्वेट येथे दिवसभर मनोभावे दर्शन घेतले अशी माहिती अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, “श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाशी आणि त्यांच्या अद्भुत लीलांशी संबंधित अनेक पवित्र वस्तू आजही भक्तांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामध्ये सर्वांत विशेष व दिव्य मानली जाणारी वस्तू म्हणजे सूर्यमणी. त्याचेच दर्शन गुढीपडावा आणि श्री स्वामी समर्थ प्रकट दिन (२० मार्च) या अत्यंत पावन दिवसांच्या लागलीच आधी पुण्यातील भक्तांना घेता येणार आहे. श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर यांच्या माध्यमातून हे शक्य होत असून इतिहासात पहिल्यांदाच या दोन्ही गोष्टींचे दर्शन भक्तांना राजवाड्याबाहेर घेता येत आहे.”

परंपरेनुसार, हा सूर्यमणी श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः अक्कलकोटच्या राजघराण्यास दिला. तेव्हापासून तो अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि जतनाने राजघराण्याकडे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार या सूर्यमणीमध्ये स्वामींच्या उपस्थितीचे आणि कृपाशक्तीचे अद्वितीय स्पंदन आजही अनुभवता येतात असे मानले जाते. स्वामी समर्थांच्या कृपेचा हा दिव्य ठेवा म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा संगम असून सूर्यमणी व स्वामींनी वापरलेल्या पादुकांचे दर्शन हे भक्तांसाठी केवळ एक दर्शन नसून स्वामी समर्थांच्या दिव्य ऊर्जेशी जोडणारा एक आध्यात्मिक अनुभव असल्याने प्रत्येक स्वामीभक्ताने अत्यंत पवित्र व अविस्मरणीय अशा या आध्यात्मिक सौभाग्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील श्रीमंत मालोजीराजे यांनी केले. दर्शनस्थळी आरती, अभिषेक तसेच होम–हवन यांसारखे धार्मिक विधीही संपन्न होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सदर दर्शन सोहळ्यासाठी सुरेखा उत्तमराव बहिरट पाटील यांनी स्थळ प्रायोजकत्व स्वीकारले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading