दिव्यांग तरुणांना योग्य मार्गदर्शनासाठी दीपस्तंभ फाउंडेशन सारख्या संस्थांची गरज -दिव्यांग कल्याण आयुक्त सत्यजित बडे
देशातील पहिली प्रज्ञाचक्षू महिला न्यायाधीश तान्या नाथन सी हिचा दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल तर्फे सत्कार
पुणे : २०११ च्या जनगणने प्रमाणे आपल्याकडे असणाऱ्या दिव्यांगांची संख्या दोन कोटी ७८ लाख इतकी आहे, त्यापैकी अवघ्या २२ टक्के जणांना सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून सेवा मिळत आहेत. उर्वरित ७८ टक्के जणांपर्यंत सेवा पोहचू शकत नसल्याने ते उपेक्षित राहिलेले आहेत. त्यामुळे यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे, ती कमी करण्यासाठी समाजातील दीपस्तंभ फाउंडेशन सारख्या संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असून त्यामुळे आपले विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे मत राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त सत्यजित बडे यांनी व्यक्त केले.
दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल यशोत्सव तर्फे देशातील पहिली प्रज्ञाचक्षू महिला न्यायाधीश झालेल्या केरळच्या तान्या नाथन सी यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी बडे बोलत होते. बिबवेवाडी येथील विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी येथील सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुण्याचे जिल्हा आणि सत्र न्यायधीश महेंद्र महाजन, जेष्ठ वकील एस. के. जैन, दीपस्तंभ फाउंडेशनचे अध्यक्ष यजुवेंद्र महाजन, प्रमुख अतिथी आर के लुंकड, डॉ. भाऊसाहेब जाधव आदी उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धा परीक्षा व इतरही क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या अभिजित गोसावी, तुषार चौगुले, यशवंत, विशाल शेलार, रोहित गायकवाड या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी तान्या नाथन सी हिच्याशी मिलिंद पाटील आणि पूनम ढवळे या दोघांनी संवाद साधला.
दिव्यांग तरुण मंडळींनी मिळवलेले यश हे वाखाणण्याजोगे आहे. आपले स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवले आहे. त्यांच्या या यशामुळे अन्य दिव्यांग तरुणांना देखील चांगली प्रेरणा मिळत आहे. आपल्याकडे असणारा दिव्यांग व्यक्तींचा आकडा खूप मोठा आहे. या सर्वांना अपेक्षित असणाऱ्या सेवा मिळत नाही. मात्र, दीपस्तंभ सारख्या संस्था त्यांना उभे करून त्यांना दिशा देण्याचे काम करत आहेत. सध्या समाजात असणारी ही दरी कमी करण्याची आवश्यकता असून त्यासाठी समाजात काम करणाऱ्या विविध घटकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे बडे यावेळी म्हणाले.
दिव्यांग असणे म्हणजे आपल्याला त्या परिस्थितीमधून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते, त्यामुळे त्यामध्ये कोणताही कमीपणा मानण्याची गरज नसल्याचे तान्या नाथन सी यांनी मुलाखतीमध्ये सांगितले. शाळेपासूनच्या आठवणी सांगताना आपल्याला शाळेपासून चांगले मित्र-मैत्रिणी मिळत गेले. अनेक प्रकारच्या संधी देखील मिळत गेल्या. कायदयाचे शिक्षण घेतल्यानंतर वकिलांकडे काम करत असताना मला तिथे काम करणारे जेष्ठ वकील म्हणाले, तान्या तू न्यायाधीश होण्यासाठी का प्रयत्न करत नाहीस ? त्यांचा तो सल्ला मी ऐकला आणि त्याची तयारी करून न्यायाधीश होण्यात यश मिळवले. कष्ट करण्याची तयारी आणि सातत्य या दोन गोष्टी आपल्याकडे असतील तर त्याचा यश मिळण्यास निश्चितपणे फायदा होत असल्याचे तान्या यांनी यावेळी सांगितले.
कोरोना काळापासून दीपस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षांसाठी मला मार्गदर्शन लाभले अशा इन्क्लुझिव्ह आणि अॅक्सेसेबल संस्था देशभरात आवश्यक आहेत, असेही तान्या यावेळी म्हणाल्या.
दिव्यांग मुलांमध्ये असणाऱ्या कर्तृत्वाला पुढे आणून त्यांना घडवण्याचे काम दीपस्तभ फाउंडेशन मनोबल करत आहे. दिव्यांगांना आधार देण्याचे काम त्यामधून होत असल्याचे एस. के. जैन म्हणाले. दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी पुण्यात राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाचा प्रकल्प उभारण्याचा निर्धार यावेळी यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केला.
