Saturday, May 30, 2026
Latest NewsSports

मलेशियामध्ये होणाऱ्या एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) स्पर्धेत पुण्यातील सार्थक चव्हाण सहभागी !!


पुणे:  मलेशियामध्ये होणाऱ्या एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) स्पर्धेत पुण्यातील १९ वर्षीय आणि टिव्हीएस रेसिंग संघाचा सार्थक चव्हाण सहभागी होणार आहे. अत्यंत थरारक आणि वेगवान ॲक्शनने भरलेल्या एका नव्या हंगामी सुरूवात मलेशियातील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे १० ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहे. ही पहिली रोड रेस सहा फेऱ्यांची होणार असून अत्यंत रोमांचक हंगामची नांदी ठरणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रसह पुण्यातील सहभागी होणारा सार्थक चव्हाण एकमेव रेसिंगपटू ठरणार आहे.

या नव्या हंगामात मलेशिया, जपान, इंडोनिया, थायलंड, स्पेन, पोर्तुगाल, कोलंबिया यांसह १७ देशातील एकूण ९६ रायडर्स सहभागी होणार आहेत. या अनेक देशांचे प्रतिनिधत्व करणारे अव्वल दर्जाचे स्पर्धक तसेच गतविजेते, उदयोन्मुख खेळाडू अशा वैविध्यपूर्ण आंतरराष्ट्रीय स्पर्धक सहभागी झाले असल्याने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कठीण आणि स्पर्धात्मक रोडरेस ठरेल, असा विश्वास एआरआरसी यांना आहे. या वर्षीच्या स्पर्धेत पाच मुख्य श्रेणींमध्ये तीव्र चुरशीच्या लढती पहायला मिळणार असून जागतिक स्तावर विस्तारलेल्या ‌‘टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप‌’ या श्रेणीमध्ये सार्थक सहभागी होणार आहे. सार्थक हा टीव्हीएस रेसिंग संघातील एक प्रमुख रायडर आहे. याशिवाय भारतामधून या स्पर्धेत चिरंत विश्वनाथ (बंगलोर), अक्षित दवे आणि के. वाय. अहमद (दोघेही चैन्नई) हे टिव्हीएस रेसिंग संघातून सहभागी झाले आहेत. हे चार भारतीय रेसिंगपटू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

सार्थक याने वयाच्या चौथ्या वर्षी बाईक चालवायला सुरूवात केली आणि वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मोटोक्रॉस स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरूवात केली. सार्थकचे वडील श्रीकांत चव्हाण पुण्यात रेस बाईक्स्‌‍मध्ये विशेषज्ञ असलेले वर्कशॉप चालवतात. सार्थक हा प्रशिक्षक अमोल तळपदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून फिटनेस कोच मिहीर तेरणीकर यांचेही मार्गदर्शन मिळत आहे. सार्थक याच्या नावावर चार राष्ट्रीय विजेतेपद असून सध्या तो भारतातील सातव्या क्रमांकाचा खेळाडू आहे. सार्थकने आत्तापर्यंत एक सुवर्ण, ८ रौप्य आणि ७ कांस्यपदके मिळवून असून अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय रेसिंगपटू ठरला आहे.

सार्थक याने २०१८ मध्ये पहिले नॅशनल ज्युनियर सुपरक्रॉस विजेतेपद जिंकले होते. सार्थकने डर्ट (मातीच्या) ट्रॅकवरून टारमॅक (डांबरी) ट्रॅककडे वळताना अनेक टॅलेंट हंट्स रेसमध्ये भाग घेतला होता. वयाच्या १७ व्या वर्षी सार्थकने प्रो-स्टॉक ३०१-४०० सीसी वर्गात सर्वात तरूण भारतीय राष्ट्रीय चॅम्पियन बनण्याचा विक्रमही केला आहे. २०२५ हंगामामध्ये सार्थकने टीव्हीएस एशिया वन-मेक स्पर्धेत ९ पोडियमसह एकून तिसरा क्रमांक पटकावला होता. तसेच स्थानिक पातळीवर इलेक्ट्रिक चॅम्पियनशिपचा विजेता आणि प्रोस्टॉक वर्गात उपविजेता अशी कामगिरी केली आहे.

या रेसिंगमधील प्रत्येक श्रेणी स्वतःची अशी एक विशिष्ट तीव्रता, चुरस आणि अनपेक्षितपणा घेऊन येत असून सुपरबाईकच्या अत्यंत स्फोटक लढतींचा हंगाम प्रेक्षकांना अनुभवयास मिळणार आहे. रेसिंग चाहत्यांना अत्यंत जवळच्या लढती आणि रेसरचा कौशल्याचा आविष्कार पहायला मिळणार आहे. ‌‘टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप‌’ या श्रेणीचे जागतिक स्तरावरील प्रतिनिधित्व आता अधिक व्यापक आणि बळकट झाले आहे. विविध खंडांमधील रायडर्स एकाच प्रकारच्या वाहनांवर शर्यतीत सहभागी होणार असल्याने ही शर्यत केवळ कौशल्य, शर्यतीचे तंत्र आणि मानसिक एकाग्रता यांची खरी कसोटी ठरणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading