युवा कलाकारांचे आश्वासक सादरीकरण ठरले भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव सुरू असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
आज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र व आर्य संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास जोशी, मंडळाच्या विश्वस्त शिल्पा जोशी, सांस्कृतिक संचालनालयाचे अधिकारी असलेले संदीप वसावे, आबासाहेब जगताप व जान्हवी जानकर आदी उपस्थित होते.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ओमकार लोहार यांच्या सादरीकरणाने झाली. त्यांनी राग पुरिया कल्याण मध्ये ‘आज सोबना…‘ ही विलंबित एकतालातील रचना गायली. यानंतर त्यांनी ‘मना हरवा आयो रे…‘ हा छोटा ख्याल प्रस्तुत केला. सुर्यकांत शर्मा (तबला) आणि ऋतुराज धुपकर (संवादिनी) यांनी त्यांना साथसंगत केली.
विराज जोशी यांनी गायलेला तिलक कामोद ने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विराज यांनी ‘तीरथ को सब करे…‘ ही रचना पेश केली. यानंतर त्यांनी ‘मन मैं मोहन बिराजे…‘ ही बंदिश गायली. ‘रामाचे भजन तेची माझे ध्यान…‘ या अभंगाने समारोप केला. त्यांना रमाकांत राऊत (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
बनारस घराण्याचे गायक, पद्मभूषण पं. साजन मिश्रा व पं. स्वरांश मिश्रा या पिता पुत्रांच्या गायनाने महोत्सवाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. या दोघांनी राग बागेश्री प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी ‘कवन गत भई मोरी…‘ हा बडा ख्याल तर ‘अवन काही गय…‘ हा छोटा ख्याल प्रस्तुत केला. त्यांना पंडित अजय जोगळेकर (संवादिनी), पंडित अरविंद कुमार आझाद (तबला), निषाद व्यास, अथर्व वैरागकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली
सरोदवादक शिराज अली खान यांच्या विलोभनीय वादनाची अनुभूती यानंतर उपस्थितांनी घेतली. त्यांनी राग कौशी कानडा वाजविला. यामध्ये त्यांनी आलाप, विलंबित गत, मध्य व द्रुत गत आणि झाला यांचे प्रभावी सादरीकरण केले. मैहर घराण्याच्या तीन तालातील धून आणि बंदिशी सादर करीत त्यांनी समारोप केला. अर्चिक बॅनर्जी यांनी त्यांना तबल्यावर साथसंगत केली. शोभा कुलकर्णी यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.
