सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत हारवाडीत जाहीर सभा
रेणापूर : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे प्रचाराचा धडाका सुरू आहे. हारवाडी (ता. रेणापूर) येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा नुकतीच पार पडली. या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, सुजात आंबेडकरांनी स्थानिक प्रश्न मांडले.
सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून स्थानिक विकासाची आहे. शेतकरी, रस्ते, पाणी, आरोग्य आणि मूलभूत सुविधा यांपासून सामान्य जनता आजही वंचित आहे. जोपर्यंत वंचित आणि शोषितांना योग्य राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही, तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जनतेच्या समस्यांसाठी ‘एक संधी’ द्या
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांना आवाहन केले की, आपल्या हक्काच्या माणसांना सत्तेत पाठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा. तसेच जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे मांडले.
या प्रचार सभेला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये संतोष सूर्यवंशी (मराठवाडा महासचिव), अमोल लांडगे (युवा आघाडी राज्य सदस्य तथा नगरसेवक), मंजुषा निंबाळकर (जिल्हाध्यक्ष) आर. के. आचार्य (तालुकाध्यक्ष), ज्येष्ठ नेते कमलाकर चिकटे यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
