Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत


पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणारे, शिस्तबद्ध प्रशासनाचे प्रतीक मानले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी) सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कार्यक्षम प्रशासक, कणखर निर्णयक्षमता असलेला नेता आणि जमिनीवरचा लोकप्रतिनिधी गमावला आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. “सकाळी सात वाजता मंत्रालयात हजर होणारा मंत्री” अशी त्यांची शिस्तबद्ध ओळख होती. त्यांच्या आकस्मिक जाण्याने बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
अपघाताचा घटनाक्रम
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे मुंबईहून एका खासगी विमानाने बारामतीकडे येत होते. सकाळी ९:१५ वाजताच्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला अचानक आग लागली. स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले, मात्र आगीची तीव्रता प्रचंड असल्याने त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.
हा अपघात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रवास करत असताना झाला. प्राथमिक माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विमानाचा तपशील
अपघातग्रस्त विमान हे ‘व्हीएसआर (VSR)’ ऑपरेटरचे ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) प्रकारचे असून त्याचा नोंदणी क्रमांक VT-SSK आहे. हे विमान प्रामुख्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) प्रवासासाठी वापरले जाते.
‘लिअरजेट ४५’ हे त्याच्या वर्गातील अतिवेगवान विमानांपैकी एक असून, ते ताशी सुमारे ८६० किमी वेगाने उड्डाण करू शकते. मुंबई–बारामती हे अंतर हे विमान अवघ्या २० ते २५ मिनिटांत पार करू शकते. छोट्या धावपट्ट्यांवर उतरण्याची क्षमता असल्यामुळे बारामतीसारख्या विमानतळांवर अशा विमानांना प्राधान्य दिले जाते. विमान वाहतूक क्षेत्रात या विमानाला त्याच्या वेग आणि चपळतेमुळे ‘लॅम्बोर्गिनी’ असेही संबोधले जाते.
प्रत्यक्षदर्शीचा थरारक अनुभव
बारामती विमानतळाजवळील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले,
“विमान उतरत असताना ते घसरताना दिसले. काही क्षणांतच मोठा स्फोट झाला आणि विमान आगीत सापडले. त्यानंतर सलग चार-पाच स्फोट झाले. आम्ही मदतीसाठी धावलो, पण आग इतकी भीषण होती की काहीही करता आले नाही. ते दृश्य अत्यंत भयावह होते.”
कुटुंबीय बारामतीकडे रवाना
अपघाताची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार तातडीने बारामतीकडे रवाना झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये होत्या. बातमी समजताच त्यांनी अधिवेशन अर्धवट सोडून तात्काळ बारामती गाठली.
अजित पवार यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार तसेच मुले पार्थ आणि जय असा परिवार आहे.
राजकीय प्रवास
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि मजबूत प्रशासकीय पकडीसाठी प्रसिद्ध होते.
१९८२ मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले, मात्र काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १९९१ पासून ते सलग बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.
जलसंपदा, अर्थ, नियोजन आणि ऊर्जा यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.
अपघातात निधन झालेले अन्य राष्ट्रीय नेते (संदर्भ)
संजय गांधी – २३ जून १९८०, विमान अपघात
माधवराव सिंधिया – ३० सप्टेंबर २००१, चार्टर्ड विमान अपघात
जी.एम.सी. बालयोगी – ३ मार्च २००२, हेलिकॉप्टर अपघात
वाय. एस. राजशेखर रेड्डी – २ सप्टेंबर २००९, हेलिकॉप्टर अपघात
गोपीनाथ मुंडे – ३ जून २०१४, रस्ते अपघात

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading