जय पराजय होत असतात, आशा सोडू नका, लढत रहा – पंकजा मुंडे
पुणे : आयुष्यात जय पराजय होत असतात. काही गोष्टी मिळतात तर काही मिळत नाहीत. पण आशा सोडू नका. लढत रहा असे आवाहन पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या दहाव्या पदवी प्रदान समारंभात त्या बोलत होत्या. अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ अजिंक्य डी वाय पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोऑपरेटिव्ह रिपब्लिक ऑफ गयानाचे भारतातील उच्चायुक्त धरमकुमार सीराज, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राकेश कुमार जैन, संरक्षण मंत्रालय अभ्यास गटाचे अध्यक्ष डॉ. निशिकांत ओझा, रजिस्ट्रार डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह विद्यापीठाच्या विविध विभागांचे डीन उपस्थित होते.
अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठातर्फे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, पंकजा गोपीनाथ मुंडे, उद्योजक व धोरणात्मक सल्लागार मनोज पोचट, गोल्डियम इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष, राशेश भन्साळी, सनातन धर्म फाउंडेशन सुदेश अग्रवाल, उज्जैन येथील गुरुजी प्रमोद शर्मा यांना डी लीट पदवी प्रदान करण्यात आली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही आयुष्याच्या नव्या टप्प्याला सुरुवात करत आहात. डोळ्यात असंख्य स्वप्ने आहेत. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कष्ट करा. पण केवळ लौकिक यशाच्या मागे धावू नका तर आनंदी व्यक्ती बना. सकारात्मक रहा. तीच तुमची ऊर्जा असेल.
डॉ अजिंक्य डी वाय पाटील म्हणाले, शिक्षित भारत घडविण्याचे स्वप्न माझ्या वडिलांनी पाहिले आहे. त्यासाठी सातत्याने काम करत आहे. भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. यावेळी विद्यार्थ्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे.
पाटील म्हणाले, अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ इनोव्हेशनचे केंद्र म्हणून पुढे यादृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे.
विद्यापीठातून नवनवीन कल्पनांचा उगम व्हावा ही आमची अपेक्षा आहे. आमचे विद्यार्थी ही अपेक्षा यशस्वीपणे पूर्ण करत आहेत.
कुलगुरू डॉ राकेश कुमार जैन म्हणाले, अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या नावातच इनोव्हेशन आहे. विद्यार्थ्यांनी विचार करून नवनिर्मिती करावी असा आमचा प्रयत्न आहे.
अभियांत्रिकी, विधी यासारख्या पारंपरिक विद्या शाखांबरोबरच नवीन ज्ञान शाखाचे शिक्षण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीला चालना मिळत आहे. विद्या माळवदे यांनी सूत्रसंचालन केले.
