‘… म्हणून ज्येष्ठ सदस्यांना पाडण्याचे षडयंत्र’; वसंत मोरे यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप
पुणे :राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून महापालिकेत चार वर्षात केलेल्या काळ्या कारभाराचा पर्दाफाश होऊ नये यासाठी पद्धतशीरपणे षडयंत्र रचून महापालिकेत दीर्घकाळ काम केलेल्या ज्येष्ठ सदस्यांना निवडणुकीत पाडण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक 38 मधील पराभूत उमेदवार वसंत मोरे यांनी केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस मधून शिवसेनेत गेलेले आबा बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष जगताप, माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, विशाल तांबे, दत्तात्रेय धनकवडेवसंत मोरे माजी विरोधी पक्षनेता गटनेता, संजय भोसले माजी गटनेता, दिपाली धुमाळ माजी विरोधी पक्षनेता, साईनाथ बाबर माजी गटनेता, अशोक हरणावळ माजी गटनेता, शंकर केमसे माजी सभागृहनेता, किशोर शिंदे माजी गटनेता, बाबू वागसकर माजी गटनेता, अविनाश बागवे स्थायी समिती सभासद, नंदाताई लोणकर स्थायी समिती सभासद, योगेश ससाने स्थायी समिती सभासद, नाना भानगिरे स्थायी समिती सभासद, रूपाली पाटील शहर सुधारणा अध्यक्ष अशा अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला.
सन 2022 ते 2026 या कालावधीत सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले आहेत. हे सर्व ज्येष्ठ सदस्य सभागृहात आल्यानंतर या सर्व प्रकारांबाबत सवाल उभे करण्यात येतील हे लक्षात घेऊनच सत्ताधाऱ्यांनी षडयंत्ररचून ज्येष्ठ नेत्यांना निवडणुकीत पराभूत केले आहे, असा आरोप मोरे यांनी समाज माध्यमाद्वारे केला आहे.
