महापालिका निकालानंतर महापौरपदासाठी रस्सीखेच, घोडेबाजाराची शक्यता
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. अनेक महापालिकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरली असून महापौरपदासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या प्रयत्नांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखली जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कल्याणमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे 11 नगरसेवक गायब असल्याची माहिती समोर आली असून हे नगरसेवक शिंदे गटाच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेचे एकूण 54 नगरसेवक निवडून आल्याने त्यांना खेचण्यासाठी इतर पक्षांकडून प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
दुसरीकडे, उल्हासनगर महापालिकेतही शिवसेना मोठा पक्ष ठरली आहे. येथे वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याने महापौरपदासाठी शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांमध्ये महापौरपदाच्या निवडीसाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू असून पुढील काही दिवसांत सत्तासमीकरणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
