… तरीही बहुराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात का येत नाहीत? रोहित पवार यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी
भारतात व्यवसाय वृद्धी करणाऱ्या बहुराष्ट्रीय अथवा परदेशी कंपन्या कर्नाटक आणि गुजरातचा पर्याय स्वीकारतात. मात्र, मुंबई हे जागतिक आर्थिक केंद्र असून देखील या कंपन्या महाराष्ट्रात का येत नाहीत, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
महापालिका निवडणुका पार पाडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत दाओस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी समाज माध्यमातून महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीबबत सवाल उपस्थित केला आहे.
Disney ही मनोरंजन क्षेत्रातील तर Honeywell ही सायबर सिक्युरिटी तंत्रज्ञानांतील आघाडीची कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतात विस्तार करण्यासाठी बंगळुरु मधील बेलंदुर ची निवड केलीय. Disney ने बेलंदुर इथे 1,74,000 Sqft जागा भाड्याने घेण्याचा करार केलाय तर honeywell ने तब्बल 4,00,000 Sqft चं ऑफिस सात वर्षांसाठी घेतलंय.
त्याचबरोबर Deloitte ने देखील मंगलुरु मध्ये येऊन तब्बल 50,000 लोकांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. maruti suzuki तब्बल 35000 कोटी गुंतवणूक करून गुजरातमध्ये नवा प्लांट उभारत आहे. मुंबई पर्यायाने महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन असताना व राज्यात बेरोजगारी वाढत असताना या कंपन्या आपल्याकडं ही गुंतवणूक का करत नाहीत, असा एक नागरिक म्हणून प्रश्न पडतो, असे रोहित पवार यांनी नमूद केले आहे.
आजपासून मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोस दौऱ्यावर जात आहेत. या दोघांनी शर्थीचे प्रयत्न करून जागतिक दर्जाच्या अशा नामांकित कंपन्यातून राज्यात जास्ती जास्त गुंतवणूक आणून राज्यातील बेरोजगार युवकांना दिलासा द्यावा ही, अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.
