Wednesday, April 8, 2026
Latest NewsPUNE

तालवाद्य कचेरी आणि फोक आख्यानाने वसंतोत्सवात भरले रंग

पुणे  : भारतीय पारंपारिक वाद्यांसह काही विदेशी वाद्यांच्या मेळातून पं. विजय घाटे प्रस्तुत तालवाद्य कचेरीच्या माध्यमातून रसिकांना वसंतोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी वेगळी नादानुभूती मिळाली. उत्तरार्धात लोकप्रिय फोक आख्यानचे सादरीकरण रंगले. डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा वसंतोत्सव कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे संपन्न होत आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात शनिवारी सायंकाळी ‘ताल-वाद्य कचेरी’ या कार्यक्रमाने झाली. पद्मश्री पं. विजय घाटे आणि प्रसिद्ध तालवादक सेल्व्हा गणेश यांनी आपल्या सहकलाकारांसह उपस्थितांना ताल वादनाची बहारदार अनुभूती दिली.

पं. विजय घाटे (तबला), सेल्व्हा गणेश (पर्कशन), गिरीधर उडुपा (घटम्), नवीन शर्मा (ढोलक), शिखर नाद कुरेशी (ड्रम सेट), अभिषेक सिनकर (संवादिनी),  सागर पाटोकर (तालवाद्य) आणि राहुल देशपांडे (गायन) या सर्व कलाकारांनी आपापल्या वाद्यांवरील प्रभुत्व तर दाखवून दिलेच, पण एकल वादनासह सह आणि समूह वादनाचा प्रत्ययही रसिकांना दिला.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अस्सल मराठी लोकपरंपरांचा पट मांडत ‘द फोक आख्यान’ रंगले आणि स्वरमंचावर अस्सल ‘मर्हाटी’ लोकपरंपरा अवतरली. महाराष्ट्राच्या कणाकणांत भरून राहिलेल्या, अस्सल मराठी मातीतल्या लोकपरंपरांचे अत्यंत जोशपूर्ण, प्रभावी आणि खिळवून ठेवणारे सादरीकरण ‘द फोक आख्यान’ या सादरीकरणातून रसिकांसमोर आले आणि सुमारे अडीच तास, या कलाकारांनी प्रेक्षकांना लोककलाप्रकारांचे वैविध्य दाखवले. लोककलांच्या सादरीकरणाची धुरा नव्या पिढीने समर्थपणे पेलली असल्याचा सुखद प्रत्ययही या आख्यानाने दिला.

लोककलांचे पारंपरिक प्रकार द फोक आख्यानातून एकापाठोपाठ सादर होत गेले. रिवाजानुसार गणोबाला वंदन करून कलाकारांनी नऊ रात्रींच्या देवीच्या आख्यानाचा मंडप बांधला. नवखंड पृथ्वीचा खेळ मांडलेल्या कृष्णाचा शोध लौलिक पातळीवर घेणार्यांना कोपरखळी मारत, धरतीची घोंगडी आणि आकाशाचा मंडप सजवलेल्या ठिकाणी मराठी मुलुखातून देवीचा छबिना, पलंगकथांच्या माळा गुंफत उत्तरोत्तर रंगत गेला. कलाकारांनी कमावलेले आवाज, पेहराव, रंगसंगती, वाद्याचे वैविध्य आणि वादकांचे कौशल्य…यामध्ये रसिक रंगून गेले आणि ‘ द फोक आख्याना ‘ च्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

टाळ, वीणा, पखवाज,  मृदुंग, ढोलकी, डफ, दिमडी, संवादिनी, बासरी…अशा देशी वाद्यांचे सूर साथीला घेत लोककलाकारांनी महाराष्ट्राच्या लोककला परंपरांची अनुभूती प्रेक्षकांना दिली. ज्ञाना, तुका, मुक्ता, जना, नामा, एका पासून आधुनिक काळातील गाडगेबाबांपर्यंत… सारी संतपरंपरा, शिवकाल, पेशवाई, स्वातंत्र्यचळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा… असे अनेक विषय वासुदेव,  गोंधळी, कुडमुड्या, शाहीर, दशावतारी, बतावणी, बहुरूपी, पोतराज…यांच्या माध्यमातून या आख्यानाने सहज सामावून घेतले होते. भगव्या झेंड्याचे वादळ निर्माण करणाऱ्या थोरल्या धन्याला मानाचा मुजरा झाला. फोक आख्यानचे लेखक सूत्रधार ईश्वर अंधारे, निर्माते रणजीत गुगळे, संगीत हर्ष विजय यावेळी उपस्थित होते.

पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारे ‘वसंतोत्सव पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ गायिका व लेखिका नीला भागवत, ज्येष्ठ गायिका गुरु विदुषी कुमुदिनी काटदरे आणि युवा हार्मोनियम वादक सौमित्र क्षीरसागर यांना विश्वस्त बापूसाहेब देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे हे १२ वे वर्ष आहे. कलाकार व संशोधक यांना मानपत्र व रोख रुपये ५० हजार तर युवा कलाकारास मानपत्र व रोख २५,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading