Friday, April 3, 2026
Latest NewsSports

‌‘पीडीएफए युथ लीग‌’ स्पर्धेचे १८ जानेवारीपासून आयोजन !!


लीगमध्ये पन्नासहुन अधिक फुटबॉल अकादमीचे १८० संघ, ३००० खेळाडू सहभागी होणार !!

पुणे :  पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए), सीटी एफसी पुणे आणि टॉपप्ले स्पोर्ट्‌‍स मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘पीडीएफए युथ लीग‌’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील पन्नासहून अधिक फुटबॉल अकादमी, क्लबचे १८० संघ आणि सुमारे ३००० खेळाडू सहभागी झाले आहेत.

स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष श्री. प्यारेलाल चौधरी, सचिव प्रदीप परदेशी आणि पीडीएफएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय चौधरी म्हणाले की, पीडीएफएला सीटी एफसी पुणे आणि टॉपप्ले स्पोर्ट्‌‍स मॅनेजमेंट यांच्या भागिदारीत नवीन जिल्हास्तरीय युवा लीग स्पर्धेची घोषणा करताना आनंद होत आहे. ही लीग म्हणजेच खेळाडूंसाठी लहान वयातच दिशा देणारा मार्ग ठरणार असून स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी, युवा प्रतिभेला व शारिरीक तंदुरूस्तीला प्रोत्साहन, खेळाव्दारे सांघिक भावना निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेला परिवर्तनकारी उपक्रम ठरणार आहे.

या स्पर्धेच्या फॉरमॅट विषयी सांगताना ते म्हणाले की, ७, ९, ११, १३, १५ आणि १७ वर्षाखालील अशा एकूण मिळून ६ गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या सर्व वयोगटात मुलांसोबतच मुलींचासुद्धा सहभाग प्रत्येक वयोगटातील संघांमध्ये असणार आहे. १८ जानेवारी २०२६ पासुन या स्पर्धेला सुरूवात होणार असून सलग पाच महिने या स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहे.

सर्व मुलांना सोयीचे जावे यासाठी स्पर्धेचे सामने प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी होणार आहेत. स्पर्धेचे सामने हे सीटी स्पोर्ट्‌‍स अरेना (मोशी), द सिक्स्टी यार्ड टर्फ (मोशी), सिटी स्पोर्ट्‌‍स अरेना टर्फ (पिंपळे गुरव), एटीके फुटबॉल मैदान रेंजहिल्स्‌‍-खडकी, हॉटफुट बावधन आणि टॉपप्ले खराडी या मैदानांवर होणार आहे.

स्पर्धेच्या ७ वर्षाखालील गटात ३-अ-साईड, ९ वर्षाखालील गटात ५-अ-साईड, ११ वर्षाखालील गटात ७-अ-साईड, १३ आणि १५ आणि १७ वर्षाखालील गटात पूर्ण ११ खेळाडूंचे सामने होणार आहेत. एआयएफएफच्या ब्ल्यु कब्ज्‌‍ आणि एआयएफएफच्या युथ लीग या फॉरमॅट नुसार या स्पर्धेची आखणी करण्यात आली आहे.

स्पर्धेतील सर्व वयोटातील विजेत्या संघांना करंडक आणि मेडल्स्‌‍ देण्यात येणार आहेत. या शिवाय स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बुट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट लीग खेळाडू, फेअर प्ले पुरस्कार, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार आणि प्रत्येक सामन्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू अशा वैयक्तिक आणि सांघिक पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे. या शिवाय स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूला प्रशस्तीपत्रकही देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading